शाळांमध्ये होणार आता पाणी सुट्टी

शाळांमध्ये होणार आता पाणी सुट्टी

Water Bell activities

शाळा भरण्याची, सुटण्याची व मधली सुट्टी अशा तीन घंटा आतापर्यंत सर्वच शाळांमध्ये होत होत्या. परंतु यापुढे त्यात आता आणखी एका घंटेची भर पडणार आहे. ती घंटा म्हणजे पाणी सुट्टीची होय. मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता हे अनेक आजारांचे प्रमुख कारण असते. अनेकदा मुले अभ्यास व खेळण्याच्या नादात पाणी पिण्याचे विसरून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी घंटा वाजवण्याचा निर्णय ‘वॉटर बेल’ उपक्रमांतर्गत शिक्षण विभागाने घेतला आहे. पाणी सुट्टीची ही घंटा शाळेच्या वेळापत्रकादरम्यान तीन वेळा होणार आहे.

शाळेतील मुले अभ्यासाच्या आणि खेळण्याच्या नादात पाणी पिण्याचे विसरून जातात. आवश्यक तेवढे पाणी न प्यायल्यामुळे मुलांना अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. वय, उंची आणि वजनासुनार मुलांनी साधारणपणे दीड ते दोन लिटर पाणी प्यावयास हवे. बर्‍याच पालकांची तक्रार असते की, मुलांनी घरातून भरून नेेलेली पाण्याची बाटली तशीच परत आणतात. पाणी कमी प्यायल्यामुळे मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांना थकवा येणे, मूत्रमार्गात संसर्ग होणे, मुतखडा होणे, चिडचिडेपणा वाढणे आदी त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांनी मुबलक पाणी प्यावे व आजारांपासून दूर राहावे यासाठी राज्य सरकारने सर्व सरकारी व खासगी शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेच्या वेळापत्रकात तीन वेळा पाणी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही पाणी सुट्टी कधी द्यायची यासंदर्भातील निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यायचा असल्याचेही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच वॉटर बेल अंतर्गत पाणी सुट्टीचा अहवाल सर्व शाळांकडून घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून शिक्षण आयुक्तांना दिल्या आहेत.

पाणी पिण्याची मानसिकता वाढण्यास मदत
‘वॉटर बेल’ अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या राखीव वेळेत मुलांना आवश्यकतेनुसार पाणी पिता येईल. परिणामी त्यांची पाणी पिण्याविषयीची मानसिकता तयार होईल व पुढे ती सवय होईल. या वेळेत मुलांना स्वच्छतागृह वापरण्याची मुभाही देण्यात येणार आहे.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये पसंती
केरळ, कर्नाटक, तेलंगणा येथील शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ हा उपक्रम राबवला जात आहे. या राज्यांमध्ये शाळेच्या वेळेत खास पाणी पिण्यासाठी दोन वेळा घंटा वाजवली जाते. त्यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक पाणी पितात. हा उपक्रम उपयुक्त असल्याने शाळांना याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘वॉटर बेल’ हा उपक्रम चांगला आहे. शाळांमध्ये स्वच्छ पाणी मिळत नसल्याने सरकारने शाळांमध्ये अ‍ॅक्वा गार्ड बसवावे. विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटल पुरवून त्या शाळेतच ठेवल्यास विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझेही कमी होण्यास मदत होईल.
– उदय नरे, शिक्षक, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल

First Published on: January 23, 2020 5:45 AM
Exit mobile version