‘या’ गावातील तरुणांसोबत लग्न करण्यास मुलींचा नकार

‘या’ गावातील तरुणांसोबत लग्न करण्यास मुलींचा नकार

मुरबाडमधील टंचाईग्रस्त खोपिवलीकरांची व्यथा

पाणी नसल्यामुळे अनेक अ़चणी येत असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईमुळे चांगल्या शिकलेल्या तरुणांची लग्न जुळत नसल्याचे समोर आले आहे. मुरबाड तालुक्यातील खोपिवली येथे पाणी टंचाईमुळे सोयरिक जुळत नसल्याचे उघडकीस आले आहे. खोपिवली या गावातील विहीरी डिसेंबरमध्येच आटण्यास सुरुवात होते आणि त्यानंतर गावातील महिलांची पाणी आणण्यासाठी वणवण सुरू होते. गावाची ही व्यथा संपूर्ण तालुक्याला माहिती असल्याने इथे कुणी सोयरिक करायला तयार नाही. त्यामुळे चांगले शिक्षण आणि नोकरी असूनही गावात तरुणांची लग्न जुळविताना अडचणी येत आहेत.

पाण्याअभावी सोयरिक जुळेना

सध्या मुरबाड तालुक्यातील १६ गावे आणि सात वाड्यांना सहा टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. या टँकरद्वारे विहिरीत पाणी टाकण्यात येते. या विहिरीतील गढूळ पाणी पिऊन आदिवासींना आणि गावातील अनेकांना आपली तहान भागवावी लागत आहे. मात्र पाणी शुद्ध करण्याच्या उपाय योजना मात्र केल्या जात नासल्याचे दिसून येत आहे.

४२ कुपनलिकेमध्ये पाण्याचा एकही थेंब नाही

खोपिवली गावाची लोकसंख्या १९०० आहे. या गावात ४२ कुपनलिका असल्या तरी सध्या त्यातून पाण्याचा एकही थेंब मिळत नाही. गावात सहा विहीरी आहेत. मात्र त्या कोरड्या पडल्या आहेत. एकदोन विहीरींच्या तळाशी काही झरे आहेत. तिथे साचणारे पाणी मिळविण्यासाठी गावकरी जिवावर उदार होऊन विहीरीत उतरतात. अक्षरश: दिवसरात्र रांगा लावून महिला विहीरीतून मिळणारे थेंब थेंब पाणी गोळा करतात. गावातील दीक्षा भांडे, धनश्री भांडे, गुलाब कराळे यांच्या सारख्या या महिला पाण्याअभावी काय काय सोसावे लागते, याच्या कर्मकहाण्या सांगतात.

पाणी आणावे लागते विकत

विहीराचा तळ खरवडून मिळणारे पाणी गावाला पुरणे अशक्य आहे. त्यामुळे गावकऱ्यांना या दिवसात चक्क पाणी विकत आणावे लागते. सध्या चार हंडे पाण्यासाठी २० रूपये मोजावे लागतात. गावातील प्रत्येक घरासमोर आपल्याला पाण्याचे ड्रम दिसतात. अतिशय गरीब असणाऱ्या या कुटुंबातील कर्ती व्यक्ती दिवसाकाठी जेमतेम २०० रूपये कमवते आणि त्यातील शंभर रूपये पाण्यासाठी खर्च करते. अशा परिस्थितीत खायचे काय, असा सवाल विलास कराळे या स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

लग्न जुळत नाही..

पाण्यासाठी महिलांचे होणारे हाल पाहून आता या गावात कुणी मुली द्याायला मागत नाहीत. मुलांना चांगल्या नोकऱ्या आहेत. शिक्षण आहे, पण त्यांची लग्ने जुळत नाहीत.


वाचा – ठाणे जिल्ह्यातील १५८ गावपाडे टँकरग्रस्त

वाचा – ठाणे जिल्ह्यातील शहरांवर भीषण पाणीटंचाईचे संकट


 

First Published on: May 14, 2019 5:21 PM
Exit mobile version