घरमुंबईठाणे जिल्ह्यातील १५८ गावपाडे टँकरग्रस्त

ठाणे जिल्ह्यातील १५८ गावपाडे टँकरग्रस्त

Subscribe

मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे संकट यंदा अधिकच गहिरे झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील १५८ गावपाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे संकट यंदा अधिकच गहिरे झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील १५८ गावपाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू असून गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात ३२ नव्या गावपाड्यांची भर पडली आहे. गेल्यावर्षी १२१ गावपपाड्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते.

यंदा ग्रामीण भागात अधिक तीव्र पाणी टंचाई

गावपातळीवर शासनाने पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक योजना झारीतील शुक्राचाऱ्यांमुळे कुचकामी ठरल्या आहेत. पाण्याची टाकी आहे, तर जलवाहिन्या नाहीत. वाहिन्या आहेत, तर जोडण्यांचा पत्ता नाही, अशी ग्रामीण भागाची स्थिती आहे. पावसाळ्यानंतर दोन-तीन महिने विहीरी आणि नैसर्गिक जलस्त्रोतांद्वारे गावपाड्यांना पाणी मिळते. मात्र मार्च ते जून या चार महिन्यात गावातील जलस्त्रोत आटल्यानंतर तेथील रहिवाशांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू होते. याकाळात पाणी मिळविण्यासाठी महिलांना बरेच कष्ट करावे लागतात. सध्या एप्रिल महिन्यातच दीडशेहून अधिक गावपाड्यांमधील रहिवाशांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू आहे. मे आणि जून महिन्यात तहानलेल्या गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाणी टंचाई निवारणासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना राबवली. जिल्ह्यातील ५४ गावांची त्यासाठी निवड करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र टंचाईग्रस्त गावांची संख्या पाहता ही योजना यशस्वी झाली नसल्याचे दिसून येते.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कसारा, वाशाळा, अजनुप, धामणी, आवरे, कोठारे, कळमगाव, माळ, लाहे, वेहळोली, वरस्कोळ, आवई, टेंभा, काळभोंडे, तलवाडा आदी गावांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीला २० लिटर पाणी दिले जात आहे. मुरबाड तालुक्यातील पाटगांव, खोपिवली, मेंदी, झाडघर, तुळई, कलंभाड, कोळोशी, कासोळे आदी गावपाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

‘भावली’ धरणाचे मृगजळ

मध्यंतरीच्या काळात इगतपुरी येथील भावली धरणातून गुरूत्वीय बलाने शहापूरमधील टंचाईग्रस्त गावपाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी योजना मंजूर करण्यात आली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील गावांची पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी मिटेल, असा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात ती योजना अद्यााप तरी मृगजळच ठरल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा अनुभव आहे.

- Advertisement -

कसाऱ्यात भीषण परिस्थिती

गेल्या वर्षी कसाऱ्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधकरणामार्फत दहा कोटी रूपये खर्चून योजना राबविण्यात आली. कसाऱ्यातील धरणाची उंची वाढविणे, जल शुध्दीकरण केंद्र, पाच लाख दहा हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ आणि चार लाख २१ हजार लिटर क्षमतेची टाकी, वितरण यंत्रणा आदी कामे पूर्ण करण्यात आली. मार्च महिन्यापासून चाचणी तत्त्वावर या योजनेतून पाणी पुरवठा होत आहे. मात्र तो आठवड्यातून फक्त एकदाच होतो. त्यात कसाºयात असलेल्या एका विहीरीचे पाणी पिण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सध्या कसाऱ्यात भीषण पाणी टंचाई आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -