कल्याण पूर्वेतील पाणी पुरवठा खंडीत; नागरिकांमध्ये संताप

कल्याण पूर्वेतील पाणी पुरवठा खंडीत; नागरिकांमध्ये संताप

काटेमानिवली येथील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीच्या पंप हाऊसमधील पंपात बिघाड झाल्याने दोन दिवसांपासून कल्याण पूर्वेतील नागरिकांना पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पाणी पुरवठा बंद

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रस्ता परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असतानाच, आता दोन दिवसांपासून अचानक पाणी पुरवठा बंद पडला आहे. पाण्या अभावी नागरिकांना दैनंदिन कामे देखील करता येत नसल्याने महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त हेात आहे. या परिसराला काटेमानिवली येथील महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा केला जातो. त्या टाकीच्या पंप हाउसमधील एक पंप बिघडलाय, तर दुसरा पंप देखील व्यवस्थित चालत नव्हता. त्यामुळे चिंचपाडा रस्ता परिसरात पाणीच येत नव्हते, रविवारपासून नागरिक हैराण झाले होते. पाणी येत नसल्याने नागरिकांनी पंप हाउसमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता बिघडलेला पंप दुरुस्तीसाठी गुजरातला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील रहिवाशी करीत आहेत.

पंप बिघडल्याने पाणी पुरवठा खंडीत झाला होता. मात्र बिघाड झालेला पंप हा दुरूस्त करण्यात आला असून, बुधवारपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. गुरूवारनंतर या परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल.  – राजीव पाठक, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग


वाचा – पाणी नाही म्हणून सौर कृषीपंपही नाही


 

First Published on: March 19, 2019 9:18 PM
Exit mobile version