रुग्णालयातील लिफ्टने घेतला महिला कर्मचाऱ्याचा बळी

रुग्णालयातील लिफ्टने घेतला महिला कर्मचाऱ्याचा बळी

रुग्णालयातील लिफ्टने घेतला महिला कर्मचाऱ्याचा बळी

लिफ्टधून बाहेर डोकावत असताना लोखंडी रॉडचा डोक्याला जोरदार फटका बसून एका महिला सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना सेंट जॉर्जेस रुग्णालयात बुधवारी घडली आहे. गीता प्रवीण वाघेला (४३) असे या महिला सफाई कर्मचाऱ्याचे नाव असून या दुर्घटनेबाबत माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

मिरा रोड येथील नित्यानंद नगर येथे राहणाऱ्या गीता वाघेला सेंट जॉर्जेस रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून कामाला होत्या. बुधवारी नेहमीप्रमाणे कामावर त्या हजर झाल्या होत्या. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास त्या तळ मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टकरता उभ्या होत्या. लिफ्ट आली आणि त्यांनी लिफ्टमध्ये प्रवेश केला. मात्र, लिफ्ट जुनी होती आणि त्यात लाकडी फळी तुटलेल्या अवस्थेत होती. दरम्यान, लिफ्ट चालू झाल्यानंतर या तुटलेल्या फळीतून त्यांनी बाहेर डोकावले असता यंत्रणेच्या लोखंडी रॉडला त्यांचे डोके आपटले आणि त्या लिफ्टमध्येच कोसळल्या.

लिफ्टमधील हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात आणून उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान ११ वाजून १५ मिनिटांनी त्यांचे निधन झाले. या घटनेचा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस तपास करीत आहेत. लिफ्टमधील तांत्रिक दोषांमुळे की अन्य कोणत्या कारणांमुळे ही दुर्घटना घडली याची चौकशी करण्यात येईल, असे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – आज राज्यात सर्वाधिक १०५ रुग्णांचा मृत्यू; तर २१९० नवे रुग्ण


 

First Published on: May 27, 2020 11:07 PM
Exit mobile version