चिक्कीत अळी आली कशी?

चिक्कीत अळी आली कशी?

तुर्भे येथील मनपाच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थिनीला खाऊ म्हणून देण्यात येणार्‍या चिक्कीत अळी सापडल्याने मनपाने कठोर पावले उचलली आहेत. या प्रकरणातील चिक्की खराब किंवा दूषित आढळल्याचे सिद्ध झाल्यास कंत्राटदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे. या चिक्कीत अळी नेमकी आली कशी? कंत्राटदाराच्या गोदामात हा प्रकार झाला की ज्या ठिकाणी चिक्की बनवली जाते, त्या ठिकाणी हे घडले, याची माहिती घेतली जात आहे.

ज्या कंत्राटदाराकडून चिक्की मुलांना देण्यात येते, त्या कंत्राटदाराच्या गोदामावर मनपा उपायुक्तांनी गुरुवारी अचानक भेट दिली आणि या ठिकाणी पाहणी केली. त्यावेळी त्यांना काही प्रमाणात त्या ठिकाणी चिक्की आढळून आली. मुलांना देण्यात येणार्‍या चिक्क्या लोणावळ्यावरून रोज रात्री आणल्या जातात. त्यानंतर सकाळी विद्यार्थ्यांना चिक्कीचे वाटप केले जाते, असे कंत्राटदाराने उपायुक्तांना यावेळी सांगितले. तरीही मुलांना देण्यात आलेल्या चिक्क्या आणि अळी सापडलेली चिक्की मनपाने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवली आहे. या प्रकरणात कंत्राटदार दोषी आढळला तर त्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा उपायुक्त महावीर पेंढारी यांनी दिला आहे.

शालेय मुलांना पौष्टीक व सकस आहार मिळावा यासाठी इस्कॉन संस्थेने पुढाकार घेऊन खाऊच्या विविध पद्धती उपलब्ध केल्या होत्या. इस्कॉन च्या या आहाराला राजकीय वर्गाकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला असता तो आहार प्रलंबित राहिला. त्यामुळे जुन्याच कंत्राटदाराकडून पुन्हा चिक्की घेण्याची वेळ मनपावर आली. हीच चिक्की कायद्याच्या कचाट्यात अडकली असतानाही पुन्हा एकदा त्यात अळी सापडल्याने चर्चेत आली आहे.

तुर्भे येथील मनपाच्या तिसरी इयत्तेत शिकणार्‍या मुलीच्या चिक्कीत अळी सापडल्याने मनपाने त्या मुलीकडील चिक्की आणि इतर मुलांना वाटप करण्यात आलेली चिक्की परत घेतली आहे. ही चिक्की तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवली आहे. येत्या दोन दिवसात लॅबमधून तपासणी अहवाल येईल, त्यानंतर पुढील पाउल उचलण्यात येईल. असा इशारा मनपाने दिला आहे.
ज्या चिक्कीत अळी आढळली ती चिक्की लोणावळा येथून आली आहे की कंत्राटदाराने स्वतः उपलब्ध करून दिली आहे. याचा अजून उलगडा झाला नसल्याचे पेंढारी यांनी स्पष्ट केले आहे. कंत्राटदार लोणावळ्यामधील एका नामंकित कंपनी कडून चिक्की मागवत असल्याने एकूणच या संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली जात आहे. या चिक्क्या नेमक्या कुठून पाठवल्या जातात याचा तपास सुरू आहे. रोजच्या रोज आलेल्या चिक्क्यांचे कंत्राटदाराकडून वाटप केले जात असल्याने त्या पडून राहत नाहीत. त्यामुळे हा प्रकार कसा घडला, याची तपासणी, चौकशी केली जात आहे.

First Published on: April 13, 2019 4:22 AM
Exit mobile version