नियमांचे मोडणाऱ्यांकडून तीन कोटींचा दंड वसूल

नियमांचे मोडणाऱ्यांकडून तीन कोटींचा दंड वसूल

नवी मुंबई महानगरपालिका

कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लेव्हल ऑफ रेस्ट्रिक्शन ऑफ सेफ महाराष्ट्र’ आदेश जाहीर करण्यात आले असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. शासनाने जाहीर केलेल्या प्रतिबंधात्मक स्तरांनुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तर ३ मध्ये असून त्यामधील निर्बंधांचे पालन करण्याविषयी व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात येत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, आस्थापना यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

याकरता विभाग कार्यालय स्तरावर कार्यरत दक्षता पथकांप्रमाणेच प्रत्येक पथकात ५ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या ३१ विशेष दक्षता पथकांकडून पालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक, आस्थापना यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूली हे महापालिकेचे उद्दिष्ट नसून आपल्या बेजबाबदार वर्तनाने सामाजिक आरोग्याला धोका पोहोचविणाऱ्यांना या दंडात्मक कारवाईद्वारे समज मिळावी, ही यामागील भूमिका असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.

पालिका क्षेत्रात ५ जून ते ४ जुलै २०२१ या एका महिन्याच्या कालावधीत ४ हजार ३१२ नागरिक, आस्थापना यांच्यावर प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली असून २१ लाख ३० हजार ५५० इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होऊ नये, याकरता दक्षता पथकांद्वारे नियंत्रण राखत पालिकेच्या वतीने कोविड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन केल्यामुळे एकूण ६५ हजार ९३७ नागरिक, आस्थापना यांच्यावर कारवाई करत तब्बल ३ कोटी २ लाख ८० हजार ६५० इतक्या दंडात्मक रक्कमेची वसूली करण्यात आलेली आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मागील आठवड्यापासून काहीसा स्थिरावलेला दिसत असून पालिकेने दैनंदिन टेस्टींगची संख्या कमी न करता ६ हजारा पेक्षा अधिक ठेवलेली आहे. तसेच कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारीही गतीमानतेने सुरु केलेली आहे. लस उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावे, याकडेही लक्ष देत लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तसेच विविध सेवा पुरविताना कोविडदृष्ट्या संभाव्य जोखमीच्या व्यक्तींच्या (Potential Superspreaders) लसीकरणाकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्याचप्रमाणे कॉरी क्षेत्रातील मजूर, रेडलाईट एरिआ, बेघर निराधार अशा दुर्लक्षित घटकांचेही लसीकरण करून घेतले जात आहे. पालिका क्षेत्रात आत्तापर्यंत ५ लाख ७० हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.

हेही वाचा –

पर्यटनबंदीमुळे आदिवासींच्या रोजगारावर संकट

First Published on: July 7, 2021 1:42 AM
Exit mobile version