आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे बनावट पत्र व्हायरल प्रकरणी एकास अटक

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे बनावट पत्र व्हायरल प्रकरणी एकास अटक

अलिबाग: आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे एक बनावट पत्र समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुणे येथून अटक केली आहे. त्याला सोमवारी अलिबाग न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.
महाराष्ट्र भूषण धर्माधिकारी यांच्या नावाचे एक पत्र शनिवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाले. या पत्रात यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे आवाहन करण्यात आले होते. समाजमाध्यमांवर हे पत्र वेगाने प्रसारित होण्यास सुरवात झाल्यामुळे खळबळ उडाली होती.
याबाबत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ५००, ५०१, ५०५ (२), ५०५(३) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे ६६ सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तपास सुरु केल्यानंतर पुणे येथून सदर तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणात आणखी काही जणांना पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जातआहे.

First Published on: April 24, 2023 10:16 PM
Exit mobile version