संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यापासून सावध रहा; पालिका आयुक्तांचे निर्देश

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यापासून सावध रहा; पालिका आयुक्तांचे निर्देश

दैनंदिन कोरोनाबाधीतांची संख्या मागील आठवड्याभरापासून शंभराच्या खाली स्थिरावलेली दिसत असताना स्थानिक आरोग्य स्थितीचा विचार करून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शासन निर्देशानुसार स्तर २ करताचे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. या निर्बंधांचे काटेकोर पालन होईल याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी करण्यात येत असलेल्या कामांचा विषयनिहाय आढावा घेतला. या बैठकीस प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता संजय देसाई, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, योगेश कडूस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड व परिवहनचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी निलेश नलावडे उपस्थित होते.

‘ब्रेक द चेन’ करता निर्बंधांचे ५ स्तर शासनामार्फत जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये नवी मुंबई महापालिका दुसऱ्या स्तरात आहे. त्याबाबतचे नवी मुंबई महानगरपालिका स्तरावरील आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामध्ये आधीचे निर्बंध स्थानिक परिस्थितीनुसार शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे कोविड प्रतिबंधासाठी अधिक सतर्कतेने काम करण्याची गरज आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही व मास्क, सुरक्षित अंतर अशा कोरोना प्रतिबंधात्मक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यादृष्टीने विभाग पातळीवरील दक्षता पथके तसेच मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथके यांनी कोविड नियमांचे उल्लंघन होणार नाही, याकरता अधिक कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेशित करण्यात आले.

आपल्याकडील पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या प्रभावाचा तसेच इतर देशांमधील तिसऱ्या लाटेच्या प्रभावाचा अभ्यास करता संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात येत असून त्याचा सुविधानिहाय आढावा यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे तसेच औषध पुरवठा यांच्याही निविदा प्रक्रिया विहीत वेळेत पूर्ण कराव्यात असे आयुक्तांनी आदेशित केले.

दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासली होती हे लक्षात घेत महानगरपालिकेच्या वतीने ४ ठिकाणी पोर्टेबल ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत असून या कामाला गती द्यावी व विहित कालावधीत काम पूर्ण करावे असे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. खासगी रुग्णालयांनीही त्यांना आवश्यक असलेला ऑक्सिजनची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करावा, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. प्रत्येक विभागात पुरेशा बेड्स क्षमतेची कोविड केअर सेंटर असावीत यादृष्टीने नियोजन करून पुढील बैठकीत तपशील सादर करण्याच्या सूचना अभियांत्रिकी विभागाला देण्यात आल्या.

कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेत आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची गरज मोठ्या प्रमाणात जाणवली होती. त्यामुळे महानगरपालिकेने कोविड केद्रांकरता तात्पुरत्या स्वरुपात भरती केलेल्या डॉक्टर्स, नर्सेस यांना आयसीयू कक्षात वैद्यकीय उपचार करण्याबाबत प्रशिक्षण दिले जात असून त्यांची क्षमतावृध्दी करण्यात येत आहे. यामध्ये कोविडच्या तिसऱ्या लाटेत कोरोना बाधीतांमध्ये मुलांचे प्रमाण अधिक असणार आहे. अशी शक्यता वर्तविली जात असून त्यादृष्टीने पिडीयाट्रीक आयसीयू कक्षामधील वैद्यकीय उपचारांबाबतही विशेष प्रशिक्षण देण्याविषयी तत्परतेने कार्यवाही करावी, असे सुचित करत आयुक्तांनी या डॉक्टर, नर्सेस प्रशिक्षणातील समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा, असेही निर्देश दिले.

हेही वाचा –

मुलांवरील उपचारांसाठी महापालिकेची टास्क फोर्स सज्ज

First Published on: June 9, 2021 1:43 PM
Exit mobile version