फी भरली नाही म्हणून पाठविले विद्यार्थ्यांचे दाखले; विश्वज्योत शाळेची मनमानी

फी भरली नाही म्हणून पाठविले विद्यार्थ्यांचे दाखले; विश्वज्योत शाळेची मनमानी

शालेय शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढण्याची मनमानी खारघर येथील विश्वज्योत शाळेने केली आहे. खारघर मधील तब्बल १७ विद्यार्थ्यांना या शाळेने शाळा सोडल्याचा दाखले थेट मेलद्वारे पाठवे आहेत. शिक्षण विभागाचे खाजगी शाळांवर नियंत्रण नसल्याने अशा प्रकारे मनमानी करण्याचे प्रकार वाढले आहेत. दरम्यान, शाळेच्या अशा भूमिकेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शाळेच्या मनमानीकडे शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देऊन शाळेवर कारवाई करावी, अन्यथा, रस्त्यावर उतरू असा, इशारा पालकांनी दिला आहे.

लॉकडाऊन काळात शाळे मार्फत ऑनलाईन शिक्षण सुरु असताना वाढीव फी भरण्यास पालकांनी नकार दिल्याने शाळेने थेट विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले पालकांना मेल केले आहेत. खारघर सेक्टर २० मध्ये हि विश्वज्योत शाळा आहे. लॉकडाऊनच्या काळात शाळांनी कोणत्याही प्रकारे सक्तीची फी वसुली न करण्याची सुचना शासनाच्या शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आलेल्या आहेत. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी देखील शाळा प्रत्यक्ष सुरु झालेल्या नाहीत. ऑनलाईन शिक्षण सुरु असताना शाळा प्रशासन वाढीव फी वसुल करण्यामागे लागल्याने विश्वज्योत शाळेमधील शेकडो पालक चिंतेत आहेत. वारंवार फी भरण्याच्या सूचना करून फी न भरल्यास ऑनलाईन शिक्षण बंद करणे, शाळेच्या व्हाटसप ग्रुप मधुन पालकांना अथवा विद्यार्थ्यांना काढुन टाकण्याचे प्रकार शाळा प्रशासन करीत असल्याचा आरोप पालक चंद्रशेखर हिरेमन यांनी केला आहे.

हिरेमन यांची मुलगी निधी हिरेमन हि या शाळेत चौथ्या इयत्तेत शिकत आहे.धक्कादायक बाब म्हणजे फी भरली नाही म्हणून सोमवारी १४ रोजी शाळेने तब्बल १७ पालकांना विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले मेल केल्याचा प्रकार घडला आहे. यापैकी अमर भगत यांचा मुलगा हा या शाळेत शिकत आहे.फी भरली नाही म्हणुन थेट शाळेतून काढून टाकण्याचा प्रकार पालकांसाठी धक्कादायक ठरला आहे.यासंदर्भात अमर भगत यांनी शाळेला हा प्रकार चुकीचा असल्याचा मेल करून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. मात्र शाळेने या मेलला कोणताच उत्तर दिला नसल्याचे अमर भगत यांनी सांगितले.

पालक हे लॉकडाऊनपुर्वी शाळेने ठरविलेल्या फी स्ट्रक्चर वरून फी भरण्यास तयार आहेत.मात्र मध्यंतरी लॉकडाऊन च्या काळात शाळेने २१ टक्के फी वाढ केल्याने पालकांचा या फी वाढीला विरोध आहे . यासंदर्भात फी वाढीसंदर्भात शाळा प्रशासनाने पालकांशी चर्चा करावी, अशी मागणी केली आहे. मात्र शाळा प्रशासन चर्चेस तयार नसल्याचे पालक हिरेमन यांचे म्हणणे आहे. फी भरली नाही म्हणून थेट विद्यार्थ्यांना शाळेतुन काढुन टाकणे हे कितपत योग्य आहे?, असा प्रश्न पालक अमर भगत यांनी उपस्थित केला आहे. फी बाबतीत शाळेची अशी मनमानी कायम सुरु असते. आजतर शाळेने दाखले पाठवून हद्द पार केली आहे, आमच्या मुलांचे भविष्य अंधारात टाकले, अशी प्रतिक्रिया अभिषेक मानकामे या पालकाने व्यक्त केली. यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता गंभीर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना परस्पर शाळेतून काढणे हे शासनाच्या शिक्षण धोरणाच्या विरोधात आहे. खारघर येथील विश्वज्योत शाळेबाबतचा अहवाल पनवेल रायगड शिक्षणाधिकाऱ्याकडे पाठविण्याच्या सूचना प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांना दिल्या आहेत. अशी प्रतिक्रिया पनवेल विभाग गट शिक्षणाधिकारी महेश खामकर यांनी दिली. दरम्यान, प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांच्याशी संपर्क केला असता, त्याचा भ्रमणध्वनी बंद होता.

First Published on: June 16, 2021 1:20 AM
Exit mobile version