‘शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२’ : नवी मुंबई पालिका राज्यात प्रथम

‘शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२’ : नवी मुंबई पालिका राज्यात प्रथम

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२’ (City Beautification and Cleanliness Competition 2022) मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘क’ वर्ग महानगरपालिकांच्या गटात नवी मुंबई महापालिकेला (Navi Mumbai Palika) राज्यात प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मुंबईतील एनसीपीए सभागृहात नगरविकास दिनाचे औचित्य साधून आयोजित विशेष समारंभात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शुभहस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnvis) यांच्या प्रमुख उपस्थितीत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांनी हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार स्विकारला.

याप्रसंगी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव नगरविकास सोनिया सेठी, अप्पर मुख्य सचिव नगरविकास भुषण गगराणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्विकारताना आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेस क वर्ग महानगरपालिकांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्र आणि १५ कोटी पारितोषिक रक्कमेचा धनादेश प्रदान करण्यात आला.

नवी मुंबई शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंती, अंडरपासच्या बाजूच्या भिंती, सोसायटीच्या भिंती, सरकारी इमारतींच्या भिंती, पाण्याच्या मोठ्या जलवाहिन्या यावर आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली. ही भित्तीचित्रे साकारताना येथील मूळ आगरी कोळी संस्कृतीला प्राधान्य देण्यात आले. तसेच परिसराला साजेशी अनुरुप चित्रे काढण्यावर भर देण्यात आला.

त्यानुसार शाळा–महाविद्यालय याबाहेरील भिंती शिक्षणाशी संबंधित विषय घेऊन रंगविण्यात आल्या. उद्यानाजवळील भिंती खेळ आणि पर्यावरणाच्या संदेश देणारे चित्रांनी, तर रुग्णालयाजवळील भिंती स्वच्छता आणि आरोग्य सेवा यासंबंधी जाणीव करून देणारी चित्रे रेखाटून सजविण्यात आल्या. यामधील अनेक चित्रे कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आगळ्या वेगळ्या सृजनशील संकल्पनांमुळे अत्युच्च कलाविष्कार प्रदर्शित करणारी ठरली आहेत. अनेक ठिकाणी त्रिमितीय संकल्पना अर्थात थ्रीडी पेंटींग आश्चर्याचा सुखद धक्का देतात.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
नवी मुंबईचे स्वरुप आकर्षित करणारे व लक्षवेधी झाले असल्याचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाखतीत नवी मुंबईच्या शहर सुशोभिकरणाचा कौतुकाने उल्लेख केला.

निश्चय केला, नंबर पहिला
कोणताही पुरस्कार हा चांगले काम केल्याबद्दल प्रोत्साहित करणारा असून त्यासोबतच अधिक चांगले काम करण्याची जबाबदारी वाढविणारा असतो, असे वक्तव्य नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले. ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ मध्ये स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वच्छताकर्मी, अधिकारी-कर्मचारी वृंद, प्रसारमाध्यमे असे सारेजण एकत्रित प्रयत्नांतून संपूर्ण क्षमतेने अधिक उत्तम कामगिरी करतील, असेही ते म्हणाले.

First Published on: April 20, 2023 8:51 PM
Exit mobile version