एनएमएमटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस

एनएमएमटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस

प्रवाशांना तत्परतेने सेवा देणार्‍या एनएमएमटीच्या ताफ्यात केंद्र शासनाने सुरू केलेल्या उपक्रमातून पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक बसेस मधील पहिल्या 100 बसेस मागील कालखंडात दाखल झाल्यानंतर आता नव्याने आणखीन आणखी 50 बसेस दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत एनएमएमटीच्या ताफ्यात एकूण 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे साध्या दरात प्रवाशांना वातानुकूलित प्रवासाचा आनंद घेता येत असल्याने त्याला अधिक प्रतिसाद मिळत आहे. मागील आठवड्यात दाखल झालेल्या नवीन 50 बसेस या लॉकडाऊननंतर नवी मुंबईकर प्रवाशांसाठी रस्त्यावर धावणार असल्याचे परिवहनचे व्यवस्थापक शिरिष आरदवाड यांनी माहिती देताना सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने अल्पावधीतच आपले जाळे मीरा-भाईंदर, मुंबई, ठाणे कल्याण डोंबिवली, बदलापुर, उरण, पनवेल आणि खोपोलीपर्यंत पसरले आहे.परिवहन सेवेच्या ताफ्यात वोल्वो बसेस देखील आहेत. स्मार्ट सिटीत नवी मुंबईने बाजी मारल्यानंतर प्रशासनाने देखील एक पाऊल पुढे टाकत पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या. परिवहन उपक्रमांतर्गत डिझेलवर चालणार्‍या 320 व सीएनजीवर चालणार्‍या 142 बसेस प्रवाशांसाठी धावत आहेत. त्यात आता नवीन एकूण 150 इलेक्ट्रिक बसची भर पडली आहे.

12 ते 20 मीटर लांबीच्या 70 आणि 8 ते 10 मीटर लांबीच्या 30 गाड्या अशा 100 बसेस यापूर्वी दाखल झाल्या असून उर्वरित 50 इलेक्ट्रिक बसेस या एप्रिल 2021 च्या पहिल्या आठवड्यात एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आरटीओ पासिंग केल्यानंतर त्यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात येणार आहे.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयातर्फे देशातील महत्त्वाच्या शहरांना हायब्रीड व इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी ’फेम’ योजने अंतर्गत अनुदान देण्यात येते अशा प्रकारच्या केंद्राच्या अनुदानातून सर्वाधिक बसेस खरेदी करणारी नवी मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.

(ज्ञानेश्वर जाधव ः लेखक ऐरोलीचे प्रतिनिधी आहे)

हेही वाचा –

मास्क न वापरल्याने २६ लाख मुंबईकरांना दंड – महापालिका आयुक्त

First Published on: April 20, 2021 4:16 PM
Exit mobile version