सिडकोतर्फे रेल्वे स्थानकांतील सोयीसुविधांच्या देखभालीसाठी विशेष समितीची स्थापना

सिडकोतर्फे रेल्वे स्थानकांतील सोयीसुविधांच्या देखभालीसाठी विशेष समितीची स्थापना

नवी मुंबईतील सिडकोच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांशी निगडीत सोयीसुविधांबाबत विविध विषयांचा आढावा घेऊन, त्यावर योग्य देखभालीसाठी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्यातर्फे एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांसह या समितीमध्ये अन्य ५ अधिकारी हे सदस्य आहेत. नवी मुंबई ही मुंबईला जोडली जावी, याकरता सिडकोने रेल्वेच्या सहाय्याने नवी मुंबईमध्ये उपनगरी रेल्वे मार्गांचे जाळे निर्माण केले. सिडकोने नवी मुंबईमध्ये विकसित केलेली रेल्वे स्थानके अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. दोन्ही बाजूस चढ-उतार करता येतील, असे प्रशस्त फलाट, भव्य फोरकोर्ट एरिया, स्थानकांवर वाणिज्यिक संकुलांची उभारणी यांमुळे नवी मुंबईतील रेल्वे स्थानके ही अन्य उपनगरीय स्थानकांच्या तुलनेत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सिडकोतर्फे सिवूड्स दारावे स्थानक वगळता नवी मुंबईतील उर्वरित स्थानकांची देखभाल केली जाते.

नवी मुंबईला सदैव गतिमान ठेवण्यामध्ये येथील उपनगरीय रेल्वेची भूमिका महत्त्वाची आहे. नवी मुंबईतील उपनगरीय रेल्वे नेहमीच कार्यक्षम राहावी. यावर सिडकोने नेहमीच भर दिला आहे. स्थानकांसंदर्भात प्रवाशांना सोयीसुविधा अधिक योग्य पद्धतीने प्रदान करण्याकरता विशेष समिती स्थापन करण्यात आली असून यामुळे प्रवास अधिक सुखकर होईल.
– डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

तसेच प्रवाशांना या रेल्वे स्थानकांवर कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये, या पार्श्वभूमीवर डॉ. संजय मुखर्जी यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये सहव्यवस्थापकीय संचालकांव्यतिरिक्त सिडकोतील मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सदस्य), अधीक्षक अभियंता (पालघर व नगर नियोजन-१, सदस्य सचिव), पणन व्यवस्थापक (वाणिज्यिक, सदस्य), नवी मुंबई महानगरपालिका प्रतिनिधी (सदस्य) आणि भारतीय रेल्वेचे प्रतिनिधी (सदस्य) यांचा समावेश आहे.

पुढील १५ दिवसांत या समितीतर्फे नवी मुंबईतील स्थानकांना भेट देण्यात येऊन सिडकोच्या व रेल्वेच्या कामांची व्याप्ती, नवी मुंबई महानगरपालिकेची भूमिका, स्थानकांवरील समस्यां संदर्भातील त्रुटी, या त्रुटी दूर करण्याकरता शिफारसी या बाबींचा आढावा समितीकडून घेतला जाणार आहे. त्यानंतर या संदर्भातील अहवाल समितीकडून डॉ. संजय मुखर्जी यांना सादर केला जाणार आहे.

हेही वाचा –

BMC : मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी महापालिकेचे मनुष्यबळ तुटपुंजे

First Published on: January 20, 2022 4:05 PM
Exit mobile version