ट्रान्स हार्बरची सेवा अडीच तास ठप्प! प्रवाशांना मनस्ताप

ट्रान्स हार्बरची सेवा अडीच तास ठप्प! प्रवाशांना मनस्ताप

कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर रेल्वेसेवा शनिवारी अडीच तास ठप्प झाली. यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर शनिवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली. त्यामुळे या मार्गावरील लोकल सेवा अडीच तास ठप्प होती. ठाणे-वाशी मार्गिकेवर ही घटना घडली असली तरी ठाणे, वाशी, पनवेलकडे जाणार्‍या दोन्ही मार्गांवरील लोकल बंद ठेवण्यात आल्या होत्या. सुदैवाने शनिवार असल्याने अनेक कार्यालये बंद होती. त्यात ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार न झाल्याने प्रवासी संख्या कमी होती. तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा ठप्प झाल्याने एनएमएमटी व एसटी बसेसने नागरिकांनी प्रवास केला. शनिवारी सुट्टी असल्याने गर्दी कमी असल्याने त्याचा अधिक त्रास झाला नाही.

ट्रान्स हार्बर मार्गावरील कोपरखैरणे ते घणसोली मार्गावर कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळील रिलायन्स कंपनी गेटसमोरील खांब्याजवळ वाशी-पनवेलकडे जाणार्‍या दिशेला दुपारी पावणेएकच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटली होती. त्यामुळे पनवेल आणि ठाण्याकडे जाणार्‍या मार्गावरील दोन्ही दिशेला जाणार्‍या लोकल थांबविण्यात आल्या होत्या. तुर्भे, ऐरोली मार्गावर लोकल ठप्प झाल्या होत्या. दुपारी पावणेएक वाजता घडलेल्या या प्रकारानंतर रेल्वेने सर्व रेल्वे स्थानकांत प्रवाशांना याची माहिती देणारी उद्घोषण केल्याने प्रवाशांनी नजीकच्या ठाणे-बेलापूर मार्गावरील एनएमएमटी, एसटी बस आणि रिक्षा तसेच खासगी वाहनांचा आधार घेतला. ही घटना घडल्यानंतर नवी मुंबई परिवहन सेवेच्या अतिरिक्त गाड्या या मार्गावर सोडण्यात आल्या, मात्र प्रवासी संख्या पाहता ही बससेवाही तोकडी पडली होती.

एनएमएमटीच्या बसेसमध्ये प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. सीबीडी, पनवेल, वाशीकडे जाणार्‍या गाड्या तुडूंब भरल्या होत्या. रिक्षाचालकांनीही तुर्भे, नेरूळ, ऐरोली, रबाळे येथे चार चार प्रवासी घेऊन ज्यादा पैसे आकारून या तांत्रिक बिघाडाचा पुरेपूर फायदा घेतला. ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम अडीच तासांनंतर पूर्ण झाल्यानंतर दुपारी ३.१० वाजेनंतर लोकल सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.

First Published on: July 10, 2022 4:30 AM
Exit mobile version