वेबसाईटवर मिळणार सप्तशृंगी दर्शनाचे पास

वेबसाईटवर मिळणार सप्तशृंगी दर्शनाचे पास

सप्तश्रृंगी गड

राकेश हिरे, कळवण : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवास गुरुवार (दि. ७) पासून प्रारंभ होत असून गडावर येणार्‍या भाविकांसाठी ऑनलाईन पास बंधनकारक करण्यात आला आहे. संकेतस्थळावरून ऑनलाईन पासची सुविधा देण्यात आली असून, प्रतितास १२०० भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा नवरात्रोत्सव सालाबादप्रमाणे यात्रा प्रकारात भरणार नसून शासकीय आदेशाप्रमाणे फक्त भाविकांना श्री भगवती दर्शनाची संधी विश्वस्त संस्थेने निर्धारीत केलेल्या नियमानुसार करण्यात आलेली आहे. ऑनलाईन दर्शन पास माध्यमातून प्रतिदिन प्रतितास १२०० प्रमाणे दर्शनाची सुविधा उपलब्ध असेल. दर्शनार्थी भाविकाचे वय किमान १० वर्षापेक्षा अधिक व वय वर्षे ६५ पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. दर्शनार्थी भाविकाचे कोविड-१९ संदर्भिय लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या भाविकांचे कोविड-१९ संदर्भीय लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण नसतील अशा भाविकांनी ७२ तासातील आरटीपीसीआर तपासणीचा निगेटीव रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे.

नवरात्रोत्सव कालावधी दरम्यान दि. ७ ते १५ व दि. १९ ते २० ऑक्टोबर या कालावधीत नांदुरी ते सप्तशृंगगड रस्ता जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये खासगी वाहतुकीसाठी बंद असणार आहे. दर्शनार्थी भाविकांना कोविड-१९ संदर्भिय नियमानुसार मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे तसेच शारीरिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. दर्शनार्थी भाविकांनी जिल्हा प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या विविध सूचनांची, अटी व शर्तीची निर्धारीत पूर्तता करुन आवश्यक ते सहकार्य देणे अपेक्षित आहे. ऑनलाईन दर्शन पास संदर्भात निर्धारीत प्रक्रिया कशी असेल याबाबतचे तपशिल व्हिडीओ व प्रेझेंटेशन प्रकारात विश्वस्त संस्थेच्या संकेतस्थळासह फेसबुक व इतर सोशल मीडियावर माहितीस्तव सादर केलेली आहे. त्याचे अवलोकन करुन संदर्भीय ऑनलाईन पासबाबतची पूर्तता करुन घ्यावी. तसेच संदर्भीय ऑनलाईन दर्शन पास संबंधित तांत्रीक अडचण उद्भवल्यास प्रशांत दामरे (मो. ९२२४३४६६०९) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन ट्रस्ट व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

या लिंकद्वारे मिळणार पासेस

सप्तशृंगी देवी दर्शनासाठी भाविकांनी ऑनलाईन माध्यमातून www.saptashrungi.netwww.ssndtonline.org या संकेतस्थळावरुन स्वत:चा दर्शन पास काढून घ्यावा. दर्शनार्थी भाविकांनी ऑनलाईन पासवर निर्धारीत करुन दिलेल्या वेळेच्या (स्लॉट) किमान १ तास अगोदर नांदुरी येथे पोलीस व महसूल प्रशासनामार्फत पासची तपासणी करुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनाने किमान अर्धातास अगोदर मौजे सप्तशृंगगड येथे दर्शन रांगेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. श्री भगवतीचा ऑनलाईन दर्शन पास हा नांदुरी ते सप्तशृंगगड बसने येतांना बसमध्ये दाखविणे अनिवार्य असेल.

First Published on: October 6, 2021 3:20 PM
Exit mobile version