आगीत होरपळून चौघांचा मृत्यू, मोखाडा तालुक्यातील दुर्दैवी घटना

आगीत होरपळून चौघांचा मृत्यू, मोखाडा तालुक्यातील दुर्दैवी घटना

मोखाडा तालुक्यातील ब्राह्मणपाडा येथील अनंता मौळे यांच्या घराला पहाटे अडीच वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर तीन जणांचा जीव वाचला. ऐन धुलीवंदनाच्या दिवशी घडलेल्या घटनेने तालुक्यावर शोककळा पसरली आहे. व्दारका मौळे (३५ ), ताऊ मौळे (१३), कृष्णा मौळे (१०) आणि गंगुबाई मौळे (७७) या चौघांचा जागीच जळून मृत्यू झाला.

मोखाडा तालुक्यातील आसे ग्रामपंचायत हद्दीतील ब्राह्मणपाडा येथे राहणारे अनंता मौळे यांचे घर आणि घराला लागूनच किराणा मालाचे दुकान आहे. पहाटे अडीचच्या सुमारास घराला अचानक आग लागली. आगीने दुकानाला भक्ष्य केले. यावेळी घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. आगीने उग्र स्वरुप धारण केल्यानंतर अर्धवट झोपेतून जागे झालेले जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा होता.

नेमक्या त्या दरवाजाजवळच आगीचे डोंब उसळल्याने कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. झोपेत असलेल्या लहान मुलांना जीव वाचवण्यासाठी बाहेर पडता आले नाही. कुटुंबप्रमुख अनंता मौळे मागील खोलीत झोपलेले असल्याने ते आग लागल्याचे कळताच सुखरुप बाहेर पडले. मात्र तोपर्यंत घराने संपूर्ण पेट घेतला होता. आगीचे उग्र स्वरुप धारण केल्याने गावकर्‍यांचे बचाव कार्ये तोकडे पडले.

त्याही स्थितीत गावकर्‍यांनी दोन लहान मुलांना छोट्याशा खिडकीतून सुखरुप बाहेर काढले. या भीषण आगडोंबात होरपळून व्दारका मौळे, ताऊ मौळे, कृष्णा मौळे, गंगुबाई मौळे यांचा मृत्यू झाला. तर भावेश अनंता मौळे (12), अश्विनी अनंता मौळे (17) हे दोघे गंभीररित्या भाजले असून त्यांना नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनंता बाळू मौळे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जात आहेत. आगीत घर आणि दुकानातील सामान जळून खाक झाले. तसेच एक चारचाकी गाडीही जळून खाक झाली. यात मौळे कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आमदार सुनिल भुसारा यांनी घटनास्थळी भेट देत मौळे कुटुंबियांचे सांत्वन केले. आगीप्रकरणी सरकारकडून भरीव आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

First Published on: March 29, 2021 11:56 PM
Exit mobile version