तमाशा कलावंत आशाबाईंच्या मुलाची पीएच. डी.ला गवसणी

तमाशा कलावंत आशाबाईंच्या मुलाची पीएच. डी.ला गवसणी

तमाशाचा फड उभा राहील तेच आपले गाव आणि या फडासोबत बदलणार्‍या शाळेत शिक्षण घेत आयआयटी चेन्नईमधून एम.टेकची पदवी मिळवणारे राम आशाबाई ठाकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएच. डी. मिळाली आहे. राम ठाकर हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कर्मचारी आहेत.

तमाशा कलावंत म्हणून काम करणार्‍या आशाबाई यांनी दोन्ही मुलांना शिक्षणाची प्रेरणा दिली. तमाशा कलावंतांचे आयुष्य जवळून बघितलेल्या राम ठाकर यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे बालपणीच ओळखले. आई तमाशा फडासोबत जात असल्याने त्यांनी दोन्ही मुलांना मामाकडे शिक्षणासाठी ठेवले. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आष्टी या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षणासोबत आईच्या आयुष्याचा प्रवास कधी या गावात तर कधी दुसर्‍या गावात, अशा पध्दतीने सुरु होता. या अस्थिर परिस्थितीत मुलांचे शिक्षण थांबायला नको म्हणून त्यांनी राम व अनिल या दोन्ही मुलांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. बारावीनंतर औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मॅकेनिकल इंजिनिअरींची पदवी घेतली. आयआयटी चेन्नई येथून एम.टेक ही पदवी मिळवल्यानंतर विदेशातील नोकरी न स्विकारता राम ठाकर यांनी नाशिकमधील मविप्र शिक्षण संस्थेच्या अ‍ॅड.बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी स्विकारली. साधारणत: ९ वर्षे नोकरी केल्यानंतर मुक्त विद्यापीठात निरंतर शिक्षण विभागात सहायक प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. गेल्या दहा वर्षांच्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुमारे 10 कोर्सेस सुरु केले. यात बी.एससी फॅशन डिझाईन, इंटेरियर डिझाईन, ऑटोमोबाईल, डिप्लोमा इन पेंटींग फाईन आर्टस्, पटकथा लेखन व्हिडीओ प्रॉडक्शन आणि डिजीटल फोटोग्राफी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

एम.टेक पदवी मिळाल्यानंतर विदेशात नोकरीची संधी उपलब्ध होत असताना त्याकडे पाठफिरवून समाजात राहुन त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची जिद्द ठेवत राम ठाकर यांनी नाशिकचा पर्याय निवडला. नोकरी मिळाली म्हणून शिक्षण आणि सामाजिक कार्य त्यांनी थांबवले नाही. तमाशा कलावंतांच्या मुलांचे आयुष्य सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. कलावंत हे साधारणत: वयाच्या 35 ते 40 वर्षापर्यंत काम करतात. यानंतर त्यांना समाजात स्थान मिळणे कठिण होते. जन्माला घातलेल्या मुलांचे आयुष्यही व्यसनाधिनतेमुळे उद्ध्वस्त झाले असते. त्यांना सावरण्यासाठी राम ठाकर यांनी सन 2002 मध्ये आई सेवाभावी संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून या महिलांना व्यावसाय सुरु करण्याचे प्रोत्साहन देणे. त्यांनी उत्पादित केलेला माल शासनाने खरेदी केला पाहिजे. तरच तमाशात जाणार्‍या महिलांचे प्रमाण कमी होईल, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केले. या कलावंतांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

तमाशा कलावंतांचे आयुष्य अगदी जवळून बघितले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील महिला व मुले यांच्यासाठी सामाजिक कार्य करायचे आहे. काही प्रमाणात मदत केली. त्यांचे आयुष्य बदलायचे असेल तर रोजगार आणि शिक्षण या दोन गोष्टींशिवाय पर्याय नाही. त्यादृष्टीने प्रयत्न करत आहे.
– राम ठाकर,सहायक प्राध्यापक मुक्त विद्यापीठ, नाशिक

First Published on: June 30, 2021 11:59 PM
Exit mobile version