कोरडवाहू शेतीत भाताचे यशस्वी उत्पादन

कोरडवाहू शेतीत भाताचे यशस्वी उत्पादन

पावसाच्या अनियमिततेमुळे भाताची शेती अडचणीत येत आहे. शेतकर्‍यांनी भरलेली रोपे पावसाच्या अनियमिततेमुळे सुकून जात असल्याने दुबार पेरणी करावी लागत आहे. यावर पेंडशेत (ता. अकोले) येथील शेतकरी काशीनाथ खोले यांनी उपाय शोधून काढला आहे. खोले यांनी पाऊस पडण्यापूर्वी कोरड्या शेतातच भात पेरणी केली आहे. विशेष म्हणजे, रोपे टाकणे, चिखलणी करणे, लावणी करणे या सर्व कामांना फाटा देत त्यांनी हटक्या पद्धतीने घेतलेल्या भातपिकाची राज्यभरात चर्चा रंगत आहे.

आता निवांत झालो. पाऊस कधीही आणि कितीही पडो, मला चिंता नाही, असे आत्मविश्वासाने पेंडशेत (ता. अकोले) येथील शेतकरी काशीनाथ खोले यांनी प्रयोगविषयी कृषी अधिकार्‍यांना माहिती दिली. त्यांच्या या प्रयोगाची सर्वत्र चर्चा सुरु असून, अनेक शेतकरी भात शेती पाहण्यासाठी येत आहेत. तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी व आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक बाळनाथ सोनवणे, रमाकांत डेरे यांनी नुकतीच खोले यांच्या एसआरटी (सगुणा) तंत्रज्ञानाने केलेल्या भात शेतीस भेट दिली. खोले यांच्या प्रयोगाचे कौतुक केले.

एसआरटी पद्धतीने इंद्रायणी, ज्ञानेश्वरीसह ११ वाणांची रोपणी

शेतकरी खोले यांनी साडेपाच एकरांवर ’एसआरटी’ पद्धतीने इंद्रायणी, ज्ञानेश्वरी, जिर्वेल, काळ भात, कोळपी २४८ या ११ वाणांचे यंत्राच्या सहाय्याने अल्पमजुरीत रोपणी केली. ते सहा वर्षांपासून या पद्धतीने शेती करून पारंपरिक पद्धतीपेक्षा तीन पटापेक्षा जास्त नफा मिळवत आहेत. कृषी विभाग व आत्मा मार्गदर्शनाखाली सगुणा जनक चंद्रशेखर भडसावळे (नेरूळ) यांच्याकडून खोले यांनी हे तंत्र आत्मसात केले. कृषी अधिकारी गोसावी व सोनवणे यांनी या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचे ठरविले आहे.

बांधावरच पर्यटकांकडून भात खरेदी

सगुणा पद्धतीमुळे गाळ, चिखलातील त्रासदायक व अतिकष्टाचे काम संपले. पाऊस पडणार, वाफसा होणार, नंतर पेरणी किंवा लावणीत एक महिन्याचा काळ जातो. तसेच, सेंद्रीय भात तयार होणार असल्याने पर्यटक बांध्यावर येत चांगला भाव देऊन विकत घेत आहेत. सर्व भाताची विक्री घरीच होते.
– सुमन काशीनाथ खोले, पेंडशेत

भातशेतीचा नवा प्रयोग ठरणार आदर्श

पेंडशेत (ता. अकोले) येथे पेरणी केलेल्या भाताची उगवण झाली आहे. ‘एसआरटी’ अर्थात सगुणा पद्धतीत एकदा गादी वाफे तयार करायचे. त्यानंतर १० वर्षे नांगरणी करायची नाही. गादीवाफ्यावर टोकण यंत्राने पाऊस पडण्यापूर्वी कोरड्यातच बियाण्यांची टोभण करायची. पाऊस झाल्यानंतर बियाण्यांची दमदार उगवण होते. रोपे टाकणे, टाकणी, चिखलणी, लावणीच्या कामास फाटा दिला जातो. त्यासाठी होणारा त्रास, कष्ट, मशागत, धावपळ, मजुरीची बचत होते. खुरपणी करायची नाही. तणनाशकाने तण नियंत्रित ठेवायचे. या पद्धतीत भातपीक २० ते २५ दिवस अगोदर तयार होते. चांगला वाफसा मिळाल्याने पीक जोमाने वाढून उत्पन्न वाढते. जमिनीचे आरोग्य सुधारते. परिणामी, तिप्पट नफा मिळत आहे. या कामात पत्नीसह मुलेही मदत करतात, असेही शेतकरी खोले यांनी सांगितले.

First Published on: July 15, 2021 11:59 PM
Exit mobile version