‘न्यूड कॉलिंग’चा मोहपाश; बदनामीच्या धमकीने लाखोंची मागणी

‘न्यूड कॉलिंग’चा मोहपाश; बदनामीच्या धमकीने लाखोंची मागणी

शहरात लॉकडाऊनमुळे सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशाच घटनांमध्ये अनोळखी तरुणींनी न्यूड व्हिडिओ कॉल करत ३२ तरुणांना जाळ्यात ओढत त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे. ‘पैसे द्या अन्यथा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही या तरुणी देत आहेत. त्यामुळे ही टोळी शोधून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान सायबर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

फेसबूक मेसेंजरद्वारे कोणत्याही व्यक्तीला कॉल करणे शक्य असते. अशाच एका घटनेत एका अनोळखी तरुणीने शहरातील सिनेदिग्दर्शक रवी जन्नावार यांना मेसेंजरवर भावनिक मेसेज केले. त्यानंतर लगेचच चार सेकंदाचा न्यूड व्हिडिओ कॉल केला. त्यात स्क्रिनच्या एका बाजूला नग्नावस्थेतील तरुणी आणि दुसर्‍या बाजूला जन्नावार यांचा चेहरा होता. अचानक झालेला हा प्रकार पाहून जन्नावार सावध झाले. त्यानंतर अनोळखी तरुणीने सर्व मेसेज व व्हिडिओ डिलीट करून त्यांना कॉल केला. तुमचा अश्लील व्हिडीओ माझ्याकडे असून पैसे द्या नाहीतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत मित्र व नातेवाईकांना पाठवण्याची धमकी तरुणीने दिली. मात्र, जन्नावार आधीपासूनच सावध असल्याने आणि त्यांना अशा प्रकारांबाबत आधीच माहिती असल्याने त्यांनी तत्काळ फेसबुक व व्हॉट्स अ‍ॅपवर असलेल्या मित्र व नातेवाईकांना मेसेज करून सावध राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

जन्नावार यांचे मेसेज पाहून अनेक मित्र व नातेवाईकांनी त्यांना कॉल करत विचारपूस केली. विशेष म्हणजे, नाशिक शहरातील २५ ते ५० वयोगटातील ३२ जणांनी आम्हालाही असेच मेसेज, न्यूड व्हिडिओ कॉल आल्याचे त्यांना सांगितले. समाजात प्रतिष्ठा, मान-सन्मानाला धोका पोहोचेल, या विचाराने त्यापैकी कुणीही ही आपबिती दुसर्‍याला सांगितली नव्हती. पर्याय नसल्यामुळे अनेकांनी भीतीने ऑनलाईन पैसेही ट्रान्स्फर केले आहेत. अनेकांनी बदनामी होईल, या भीतीने तक्रार करणे टाळल्याचेही त्यांना सांगितले. याप्रकरणी रवी जन्नावार यांनी शहर सायबर पोलिसांशी संपर्क साधला.

अनोळखींशी संवाद टाळा

नागरिकांनी अनोळखी तरुणींशी ऑनलाईन संवाद करणे टाळावे. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. अनोळखी व्यक्तीची प्रोफाईल माहिती करून घ्यावी. त्यातून फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच संवाद बंद करून त्यांना ब्लॉक करावे.
– रवी जन्नवार, सिनेदिग्दर्शक, सदस्य, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ

First Published on: May 17, 2021 7:54 AM
Exit mobile version