महाविद्यालयीन शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’!

महाविद्यालयीन शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च २०२० पासून गेले दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेली महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याने १३ वी ते १५ वी व त्यापुढे शिक्षण घेणारी पालघर जिल्ह्यातील ४३ महाविद्यालयातील १ लाख ५० हजाराहून अधिक विद्यार्थी आपल्या शैक्षणिक जीवनाचा पुनःश्च प्रारंभ करणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये त्यांच्या स्वागताला सज्ज झाली आहेत. पहिल्या दिवसापासून कॉलेज कट्टे त्यामुळे बहरले जाणार आहेत. कोरोना काळावर मात करत तब्बल दीड वर्षानंतर महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ, विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या मार्गदर्शनानुसार ५० टक्के क्षमतेने २० ऑक्टोबरपासून उच्च महाविद्यालय सुरू होत आहेत. याअगोदर कनिष्ठ महाविद्यालय सुरु झाली असून जवळपास ७५ टक्के प्रतिसाद वर्गांमध्ये दिसून येत आहे. महाविद्यालय सुरु झाल्याचा आनंद शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

पालघर जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापनशास्त्र, अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, शिक्षणशास्त्र, विधी, वास्तुविद्याशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, स्वयम् अर्थसहाय्य अभ्यास अशी एकूण ४३ महाविद्यालये आहेत. पालघरमधील सोनोपंत दांडेकर, विरारमधील विवा महाविद्यालय, वसईतील वर्तक महाविद्यालय यांच्यासह सर्व महाविद्यालये १ लाख ५० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. शिक्षक शिक्षकेतर सहकारी उत्साहाने पूर्वतयारी करत आहेत.

ऑनलाईन आणि ऑफलाईन संमिश्र शिक्षण देणे विद्यापीठाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे शिक्षकांचा कार्यभाग वाढणार आहे. परंतु विद्यार्थ्यांचे हित आणि आपली नैतिक जबाबदारी म्हणून शिक्षक आपले शंभर टक्के योगदान देणार आहेत, यात शंका नाही. शिक्षण संस्थांनी स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणा यांची मदत घेऊन आपल्या महाविद्यालयात लसीकरणाची शिबिरे भरवावीत. तसेच जे विद्यार्थी याप्रक्रियेत बाहेर राहणार आहेत, त्यांचाही शोध घ्यावा लागणार आहे.
– प्राचार्य डॉ. किरण सावे, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर

शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये असलेला आणि अपरिहार्यपणे स्विकारावा लागलेला तांत्रिक दुवा बाजूला सरणार आहे. अध्यापन प्रक्रियेला पुन्हा मानवी स्पर्श लाभणार आहे. याचा आनंद शिक्षक-विद्यार्थ्यांना झाला आहे. महाविद्यालये सुरू होणार असल्याने प्रश्नोत्तरे, चर्चा, शंका-समाधान तेथील वर्गांमध्ये घडणार आहे. विद्यार्थीदेखील महाविद्यालयीन जीवनातील मित्रांच्या गाठीभेटी यांना मुकली होती. ते आत्ता पुन्हा नव्याने सुरुवात होणार आहे.

महाविद्यालयाचा आत्मा असलेला विद्यार्थी केंद्रस्थानी येणार आहे. विद्यार्थी पुन्हा शैक्षणिक पर्यावरणात अध्ययन करणार आहे. ग्रामीण भागातील बरेचसे विद्यार्थी घरी असल्यामुळे पालक त्यांच्याकडे शेतीत काम करण्याची अपेक्षा ठेवत होते. तसेच हंगामी तत्त्वावर विद्यार्थी काम करत होते. ते आता पुन्हा महाविद्यालयाकडे वळणार आहेत. शिकवला जाणारा अभ्यासक्रम त्याची संदर्भ साधने, संदर्भग्रंथ यापर्यंत विद्यार्थ्याला पोहोचता येत नव्हते. आता त्यांच्यासाठी ग्रंथालयाची दालने उघडणार आहेत. महाविद्यालयाचे ग्रंथपाल आणि सहकारी कर्मचाऱ्यांना पुस्तक देवाण-घेवाणीचे समाधान मिळणार आहे.
दोन लसीकरण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. प्रत्यक्ष परिस्थिती पाहता नव्याने सुरू होणाऱ्या महाविद्यालयांना शहरी आणि दुर्गम भागातील विद्यार्थी कसा प्रतिसाद देतील याविषयी नक्की सांगता येत नाही. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे अजूनही लसीकरण झालेले नाही. प्रवास खर्च देखील वाढला आहे. शासकीय वसतिगृहे सुरु होण्याच्या विचाराधीन आहेत. अनेक पालकांचे रोजगार गेले आहेत. या गोष्टींचा प्रभाव महाविद्यालय सुरु होण्यावर पडणार आहे.

हेही वाचा –

कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा पदाचा राजीनामा

First Published on: October 19, 2021 8:37 PM
Exit mobile version