कामगार नेत्यांच्या त्रासामुळे तारापूरमधील उद्योजक मेटाकुटीला

कामगार नेत्यांच्या त्रासामुळे तारापूरमधील उद्योजक मेटाकुटीला

बोईसर, दोन वर्षे कोरोना टाळेबंदीमुळे उद्योगक्षेत्र आर्थिक संकटातून कसेबसे सावरत असताना तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक कामगार नेत्यांच्या त्रासामुळे अक्षरक्ष: मेटाकुटीला आले आहेत. वाढत्या जाचामुळे काही उद्योजक आपले कारखाने शेजारील राज्यात स्थलांतरित करण्याच्या मनस्थितीपर्यंत आले असून असे झाल्यास पालघर जिल्ह्यातील हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळणार आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्राजवळील महागाव येथील प्रसिद्ध किसान मोल्डिंग या कंपनीचे मालक आणि व्यवस्थापन हे कामगार नेत्यांच्या सततच्या त्रासामुळे अक्षरक्ष: मेटाकुटीला आले आहेत. दोन वर्षांपासून या कंपनीत कार्यरत कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि युनियन लीडर्स हे लहान-सहान कारणांवरून कामगारांना भडकवून त्रास देत असल्याचे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. किसान मोल्डिंग या कंपनीत २५० कायमस्वरूपी आणि १५० कंत्राटी असे जवळपास ४०० कामगार काम करीत आहेत. सुरुवातीला पक्क्या मालाचे महिन्याला २० ते २२ मेट्रीक टन उत्पादन घेणारी ही कंपनी कामगारांच्या सततच्या कामबंद आंदोलनाचा उत्पादन प्रक्रीयेवर विपरीत परीणाम होऊन मासिक उत्पादन ५० टक्क्यांनी घसरून कंपनी तोट्यात गेली आहे. जुलै २०२२ मध्ये वेतन वाढ आणि इतर लाभांसाठी कंपनीतील २०० कायमस्वरूपी कामगारांनी बेमुदत संप पुकारला होता. यावेळी कंपनी व्यवस्थापन, कामगार संघटना आणि कामगार उप आयुक्त यांच्यामध्ये अनेकवेळा बैठका होऊन कामगारांच्या वेतनवाढीचा करार करण्यात आला होता.

मात्र यानंतर देखील कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि युनियन लीडर्स हे कंपनीतील भंगार, लेबर, हाऊसकिपींग, कँटीन इत्यादी कंत्राट मिळविण्यासाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी व्यवस्थापनावर दबाव टाकत असल्याचा आरोप होत असून या सततच्या त्रासामुळे कंपनी व्यवस्थापन अक्षरक्ष मेटाकुटीला आले आहे. त्यातच मागील आठवड्यापासून कंपनीत कार्यरत १५० कामगारांना कायम करणे आणि वेतनवाढ या मागण्यांसाठी कामगार संघटनेने पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.
काही कामगार नेते आणि युनियन लीडर्सच्या या सततच्या जाचामुळे तारापूरमधील उद्योजकांत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून आधीच सरकारच्या निष्क्रियतेमुळे आणि उद्योगस्नेही वातावरणाअभावी राज्यातील उद्योगधंदे आणि गुंतवणूक शेजारील राज्यात जात असल्याचे राज्य सरकारवर आरोप होत असताना तारापूरमधील उद्योगांचे इतर राज्यात स्थलांतर झाल्यास काम करणारे हजारो कामगार आणि त्यांची कुटुंबे देशोधडीला लागण्याची भीती आहे.बो

First Published on: January 5, 2023 9:49 PM
Exit mobile version