तीन तिघाडी! चोरायचे मोटारसायकल गाडी

तीन तिघाडी! चोरायचे मोटारसायकल गाडी

बोईसर : तारापूर एमआयडीसीतील दरोडा प्रकरणी अटक केलेल्या या तिन्ही आरोपींची पोलीस रिमांड चालू होती. कसून चौकशी केली जात होती.या चौकशीत या तीन जणांच्या टोळीने दुचाकी चोरीची कबुली दिल्यावर पोलिसांसमोर एका नव्या मोठ्या रॅकेटचा उलगडा झाला. चोरांनी ठाणे ग्रामीण,पालघर जिल्हा,नाशिक ग्रामीण,मीरा-भाईंदर,वसई-विरार या परिसरातून अनेक दुचाकी चोरून त्या जव्हार,मोखाडा,शहापूर,वाडा आणि विक्रमगड या तालुक्यातील ग्रामीण भागात कमी किंमतीत विक्री केल्याचे कबूल केले.राम सखाराम काकड(वय १९ वर्षे,रा.वांद्रे ता.शहापूर),गुरुनाथ पांडुरंग झुगरे (वय-२० वर्षे,रा.बोटोशी,ता.मोखाडा) आणि नितेश संजय मोडक(वय २२ वर्षे,रा.वाघेची वाडी,ता.जव्हार) अशी या तिघांची नावे आहेत. यामध्ये पोलिसांनी त्यांच्या माहितीवरून १९ लाख ६० हजार किमतीच्या तब्बल ३८ दुचाकी जप्त केल्या आहेत.पालघर जिल्ह्यात दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.

बोईसर स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सागर पाटील हे २० फेब्रुवारीच्या मध्यरात्री आपल्या पथकासह तारापूर एमआयडीसी भागात गस्त घालीत असताना कॅम्लिन नाका परिसरात तिघे जण बिगर नंबर प्लेटच्या दुचाकींवर संशयीतरित्या फिरताना आढळले होते.त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तारापूर एमआयडीसीमधील फास्ट टेक इंजिनियर्स प्रा.लि.या कंपनीत दरोडा टाकून कॉपर वायर चोरीचे प्रयोजन असल्याचे त्यांनी चौकशीत कबूल केले.पोलिसांना झडतीमध्ये त्यांच्या बॅगेत धारधार कोयता,लोखंडी कटावणी,मिरची पूड,दोरी,कटर,स्क्रू डायव्हर असे साहित्य मिळून आले होते.याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्यावर बोईसर पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम ३९९,४०२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोरीचे हे मोठे रॅकेट पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट,पोलीस उप अधीक्षक (गृह) शैलेश काळे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील,भरतेश हाऊगिरे,हवालदार दीपक राऊत,कैलास पाटील,दिनेश गायकवाड,कपिल नेमाडे,नरेंद्र पाटील,हिरामण खोटरे,संदीप सरदार व नरेश घाटाळ यांच्या पथकाने पार पाडली.

मौजमस्तीसाठी करायचे चोरी

जव्हार,मोखाडा आणि शहापूर सारख्या दुर्गम भागातील या चोरांनी केवळ मौजमस्ती करण्यासाठी पैसे पाहिजेत म्हणून दुचाकी चोरीचा धंदा सुरू केला होता.यामध्ये पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चोरलेल्या दुचाकी ग्रामीण भागातच विकण्याची आयडीया शोधली होती.

First Published on: February 27, 2023 9:58 PM
Exit mobile version