महापालिकेच्या आडून कोट्यवधींचा घोटाळा; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

महापालिकेच्या आडून कोट्यवधींचा घोटाळा; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

मिरा भाईंदर महापालिकेच्या आडून पाचशे कोटींचा जमीन घोटाळा करण्यात आला आहे. त्यावर पांघरून घालण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाईंदरमध्ये बोलताना केला. आव्हाड यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यालयांची उद्घाटने झाली. त्यानंतर झालेल्या जाहिर सभेत आव्हाड यांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावरच थेट निशाणा साधला. मिरा भाईंदरमध्ये चाललेल्या लुटमारीची कागदपत्रे गोळा होत आहेत. त्यानंतर लुटमारीवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आव्हाड यांनी यावेळी बोलताना दिला.

शहरात महापौर ज्योत्स्ना हसनाळे, महापालिका दिलीप ढोले आयुक्त, स्थायी समिती सभापती यांचे नाही तर नरेंद्र मेहतांचीच चालते. अमेरिकेत ९११ आणि मीरा भाईंदरमध्ये मेहतांची ७११ आहे. कांदळवन, सीआरझेडचे उल्लंघन झाले असताना फाईव्ह स्टार क्लबची परवानगी कोणत्या कायद्याखाली दिली ते आजपर्यंत कळले नाही. विधानसभेत पहिल्यांदा मी विषय काढला होता. आता सरकारी पातळीवर चौकशी सुरु असून लवकरच कठोर कारवाई केली जाईल, असेही आव्हाड यांनी सांगितले. मेहतांनी शहराचे मालक बनून जे नुकसान केले आहे. त्याविरुद्ध बोलले पाहिजे. मेहताला हटवण्यासाठी महाविकास आघाडी बनली पाहिजे. महाविकास आघाडी बनली तरच भाजपला पराभवाची धूळ चारू. एकीकडे मेहता तर दुसरीकडे नयानगरचा सुल्तान. या दोघांची सल्तनच खालसा करायची आहे, असे सांगत आव्हाड यांनी काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांच्यावरही निशाणा साधला.

मीरा भाईंदरमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती. तेव्हा गणेश नाईक माझ्या शहरात प्रवेश करू नका, असे सांगायचे. नाईकांचा ध्रुवकिशोर पाटील आणि प्रकाश दुबोले यांनी राष्ट्रवादी सोडली तेव्हा नाईकांशिवाय हे घडूच शकत नाही याकडे लक्ष वेधून पक्षनेतृत्वाला सावध केले होते. पण, त्यावेळी माझे ऐकले नाही व शहरात पक्षाचे मोठे नुकसान झाले, अशी खंत आव्हाड यांनी यावेळी बोलून दाखवली.

पराभवाच्या भीतीने शेतकरीविरोधी कायदे रद्द

उत्तर प्रदेश, पंजाब यासह पाच राज्यातील निवडणुकीत मोठा पराभव होईल. पुढे देशातसुद्धा पराभव होईल, या भितीपोटीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी कायदे परत घेतले. मोदींना शेतकऱ्यांचा कळवळा अजिबात नाही. शेतकऱ्यांच्या लढ्याला नक्षलीपासून अतिरेकीपर्यंत हिणवले गेले. परदेशातून पैसे येतो सांगितले. परंतु शेतकऱ्यांनी देशाच्या हिताचा विचार करून ३६० दिवसांचा लढा दिला. यात ७०० शेतकरी शहीद झाले. जालियनवाला बागेत इंग्रजांनी जशा गोळ्या घातल्या त्याचप्रकारे मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांवर अश्रूधूर, पाण्याचा मारा केला. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने अंगावर गाडी घालून शेतकऱ्यांना चिरडले, असा संताप आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा –

मुंबई पोलिसांकडून बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश, लाखों रुपयांच्या नोटा जप्त

First Published on: November 24, 2021 2:54 PM
Exit mobile version