लोकाभिमुख कामे करून नव्या वास्तूला प्रतिष्ठा द्या; मुख्यमंत्र्यांचे अधिकार्‍यांना आवाहन

लोकाभिमुख कामे करून नव्या वास्तूला प्रतिष्ठा द्या; मुख्यमंत्र्यांचे अधिकार्‍यांना आवाहन

पालघर जिल्ह्याची संस्कृती, परंपरा जपून जिल्हा प्रशासनाने विकास करावा. अधिकार्‍यांनी लोकाभिमुख कामे करून नवीन वास्तूला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर जिल्हा मुख्यालयाचे ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण केल्यानंतर केले. गेल्या अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या नवनगरातील सिडकोने उभारलेल्या जिल्हा मुख्यालयाचे लोकार्पण राज्याचे मुख्यामंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विविध मंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन प्रणालीने झाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेही जोडले गेले होते. खराब हवामानामुळे व्यक्तीशः उपस्थित राहता आले नाही. पण, लवकरच नव्या वास्तूला भेट देईन, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, महसूल, ग्रामविकास, बंदरे राज्यमंत्री अब्दुल सत्तर, पालघरच्या नगराध्यक्षा उज्वला काळे, महिला महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, आमदार दौलत दरोडा, आमदार राजेश पाटील, आमदार विनोद निकोले, आमदार श्रीनिवास वनगा इत्यादी लोकप्रतिनिधी यावेळी पालघरमध्ये उपस्थितीत होते. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, कोकण विभागीय आयुक्त विकास पाटील, सिडकोचे सहसंचालक डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ, कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, वसई विरार महापालिकेचे आयुक्त डी.गंगाधारण हेही यावेळी हजर होते.

हा लोकार्पण सोहळा ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत झाला. त्या गावच्या प्रथम नागरिक असलेल्या महिला सरपंच मिथिला मुकेश संखे यांना मात्र सोहळ्याचे आमंत्रण नव्हते. त्यामुळे गावकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. पालघर जिल्हा परिषदेच्या वेब पोर्टलचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालघर जिल्हा परिषदेचा वेब पोर्टलचे उदघाटन करून लोर्कापण करण्यात आले. यावेळी या पोर्टलवर जिल्हा परिषदेने नमुद केलेले नाविन्यपुर्ण रचना आणि विविध योजनांची माहिती असल्याचे दाखवण्यात आली. पालघर ग्रामीण रूग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पणही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 146 ठिकाणी हवेतून ऑक्सीजन निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्हयाला भविष्यात आवश्यक प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध होणार आहे.

खासदार राजेंद्र गावीत यांची खंत जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्ह्यावर अनेक प्रकल्प केंद्र आणि आधीच्या सरकारने लादून जनसामान्यांच्या भावनेचा अनादर केला आहे. वाढवण बंदरामुळे प्रगती जरी होणार असली तरी स्थानिक ग्रामस्थांसह किनारपट्टीवरील मच्छिमार देशोधडीला लागणार असल्याची खंत खासदार राजेंद्र गावीत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. पूर्वी जिल्हा नियोजनमध्ये फक्त नगरपालिकांचाच विचार होत होता. त्यावेळी स्थानिक नेतृत्व असलेले अनेक जण जिल्हयासाठी आग्रही नव्हते. राज्यमंत्री असताना आपणच जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करून पालघर जिल्हा अस्तित्वात आणल्याचेही त्यांनी सांगितले. आदिवासी क्षेत्रांतून अनेक प्रकल्पांसाठी आदिवासींच्या जमिनी अधिग्रहित करून त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम सुरू आहे. हे थांबले पाहिजे, अशीही मागणी गावीत यांनी यावेळी बोलताना केली.

हेही वाचा –

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दुग्धाभिषेकानं शुद्धीकरण, नारायण राणेंनी घेतलं होतं दर्शन

First Published on: August 19, 2021 8:18 PM
Exit mobile version