कुटीर रुग्णालयात कोविड विभाग

कुटीर रुग्णालयात कोविड विभाग

तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जव्हारच्या कुटीर रुग्णालयात ५० बेडचे कोविड रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. पूर्णपणे ऑक्सिजन बेडची सुविधा याठिकाणी असणार आहे. जव्हार आणि मोखाडा तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या पंधरा दिवसांत दोन्ही तालुक्यात दररोज किमान २०० ते २५० रुग्ण आढळत आहेत. येथील रुग्णांना विक्रमगड येथील रिव्हेरा कोविड सेंटरमध्ये जावे लागते. एकतर हे कोविड सेंटर दूरवर आहे. आता तर तेही फूल झाले आहे. यासाठी जव्हारमधील कुटीर रुग्णालयात कोविड सेंटर तयार करण्यात यावे. तसेच शंभर बेडचे आयसोलेशन वार्ड तयार करावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष दिनेश भट, पारस सहाणे यांनी केली होती.

ग्रामीण भागात रुग्णसंख्या अत्यंत झपाटयाने वाढत आहे. मात्र जव्हार येथे गोळया औषधापुरते मर्यादीत कोव्हिड सेंटर आहे. या दोन तालुक्यातील जनतेला प्राथमिक उपचारानंतर विक्रमगड येथीस रिव्हेरा कोविड सेंटरमध्ये जावे लागते. तेथील रुग्णसंख्येची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे तेथे कोणत्याही नविन रुग्णांना सामावून घेतले जात नाही. त्या व्यतिरिक्त पोशेरी , धुंदलवाडी , वाणगाव , पालघर व बोईसर ही केंद्रे सुध्दा पुर्ण क्षमतेने भरलेली आहेत. दोन्ही तालुक्यातील जनता ही अतिशय गरिब असल्याने ती कोठेही खाजगी दवाखान्यात जाऊ शकत नाही.

जव्हार कुटीर रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेड तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रुग्णालयात ऑक्सिजन बेडच्या व्यवस्थेसाठी मापदंड घेणारे व्यक्ती येऊन गेले असून, लवकरच जव्हारच्या कुटीर रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेड सुरू करून येथील रुग्णांना जव्हारलाच दाखल करून उपचार करण्यात येणार आहे.
– डॉ. रामदास मराड, वैद्यकीय अधीक्षक, कुटीर रुग्णालय, जव्हार

जव्हार येथील कुटीर रुग्णालयात तीन इमारती आहेत. त्यापैकी एका इमारतीत कोविड केअर सेंटर तयार केल्यास तेथे तातडीने शंभर खाटांची ऑक्सीजनसह लागणारे डॉक्टर, नर्सेस आणि वार्डबॉयसहह इतर यंत्रणेसह तातडीने सोय होऊ शकते. तेथे सध्या नॉनकोविड रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. उर्वरीत यंत्रणा सुसज्ज आहे. सध्या आंतररुग्ण संख्या साधारण ६५ इतकी आहे. जी संख्या नेहमी १६५ ते १८० इतकी असते. याठिकाणी १ वैद्यकीय अधिक्षक आणि १३ वैद्यकीय अधिकारी असे एकूण १४ डॉक्टर्स आणि सुमारे ३५ नर्सेस येथे कार्यरत आहेत. या सर्वांचा विचार केल्यास कोविड सेंटरसाठी डॉक्टर व नर्सेस कमी पडणार नाहीत. ऑक्सिजन सिलेंडरचा साठा काही प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे येथे मुबलक खाटा आहेत. ही इमारत तळमजला, पहिला मजला, दुसरा मजला अशा तीन मजल्यांमध्ये आहे. तेथे सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे तेथे नवीन कोविड सेंटर तयार करण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

फक्त त्याच यंत्रणेत व्यवस्थित नियोजन केल्यास हे कोविड सेंटर तातडीने सुरु होऊ शकते. त्यामुळे जव्हार आणि मोखाडा या दोन तालुक्यातील रुग्णांचे होणारे हाल थांबू शकतात, असे दिनेश भट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री तसेच कृषीमंत्री दादाजी भूसे, आमदार सुनील भुसारा यांच्या निर्दशनास आणून दिले होते. त्याची दखल घेऊन आरोग्य विभागाने कुटीर रुग्णालयात ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा –

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कुठे ? मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल

First Published on: April 21, 2021 5:09 PM
Exit mobile version