मिरचीच्या लागवडीने शेतकर्‍यांचे आयुष्य गोड

मिरचीच्या लागवडीने शेतकर्‍यांचे आयुष्य गोड

वाडा : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकर्‍यांना बसतो. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी विकेल तेच पिकवेल, ही संकल्पना अमलात आणून प्रगती साधतात. वाडा तालुक्यातील देवघर येथील शेतकर्‍यांनी मिरचीची लागवड करून यातून आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधत यशस्वी वाटचाल केली आहे. प्रयोगशील शेतकरी किशोर पाटील हे दरवर्षी बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन आपल्या शेतात नवनवीन तंत्रज्ञान वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करून दर्जेदार पीक घेत असतात.या वर्षीही त्यांनी मल्चिंग पद्धतीने हिरव्या मिरचीचे चांगल्या प्रकारे पीक घेतले आहे. मिरची ही अगदी भरून आली आहे. या मिरचीला मागणी ही खूप आहे.

सध्या मिरची तयार झाली असून भावही बरा असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. किशोर पाटील या शेतकर्‍याने आपल्या दीड एकर जागेत नारायणगाव येथून रोपे आणून त्यांची लागवड केली असून त्यासाठी त्यांनी तब्बल अडीच लाख रुपये खर्च केला आहे. त्यांना 20 टन मिरची निघेल अशी आशा आहे. त्यातून सहा लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. योग्य बियाणे,गरजे नुसार विद्राव्य खतांची मात्रा दिल्यामुळे सुमारे 60 दिवसाच्या कालावधीत मिरची पीक काढणीस आले आहे. सध्या 40 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे.

 

मागील 21 वर्षांपासून मी शेतीत नवनवीन प्रयोग करून वेगवेगळे पिके घेतो. यावर्षी मिरचीची शेती केली असून पीकही चांगले आहे. सध्या भावही बरा असल्याने यावर्षी मिरची फळदायी होईल, अशी अपेक्षा आहे.
– किशोर पाटील, मिरची उत्पादक शेतकरी

First Published on: March 12, 2023 9:09 PM
Exit mobile version