डहाणूत दोन दिवस चिकू महोत्सवाची धूम

डहाणूत दोन दिवस चिकू महोत्सवाची धूम

बोईसर: थंडी संपून वातावरणात हळूहळू उकाडा वाढू लागला असतानाच डहाणूत मात्र उद्यापासून दोन दिवस चिकू महोत्सवाची मधुर रसाळ चव व सुगंध बहरणार आहे.डहाणू जवळच्या निसर्गसंपन्न बोर्डी येथील समुद्रकिनारी असलेल्या एस.आर.सावे कॅम्पिंग ग्राऊंडवर यंदा १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी नवव्या चिकू फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस रंगणार्‍या या चिकू फेस्टीवलचे उद्घाटन स्वातंत्र्यसैनिक व शेतकरी जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते होणार असून उद्योजक नरेश राऊत हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.तर या समारभांस प्रमुख अतिथी म्हणून नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष डॉ.दीपक चौधरी आणि इंडीया टुरीझमच्या सहाय्यक निर्देशिका शतरूपा दत्ता हे उपस्थित राहणार आहेत.कोरोना संक्रमणाच्या निर्बंधांमुळे दोन वर्ष खंडित झालेल्या चिकू फेस्टीवल सुरू होण्याची स्थानिक नागरिकांसह दूरवरच्या पर्यटकांना देखील प्रचंड उत्सुकता आहे.रुरल एंटरप्रेनर वेल्फेअर फाउंडेशन, विविध स्थानिक संस्था , प्रायोजक व स्टॅाल धारकांच्या सहकार्याने बोर्डी येथे ९ व्या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. “बेस्ट फ्रॉम वेस्ट” या थीमवर यंदा फेस्टिवलमधील एकंदर सजावट केली जाणार असून यामध्ये स्थानिक उत्पादने, कलाविष्कार यांना “वोकल फॅार लोकल” या संकल्पनेवर आधारीत उपक्रमांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

दोन दिवसाच्या या फेस्टिवलमध्ये स्थानिक खाद्यसंस्कृतीला चालना देणारे स्टॉल मांडले जाणार असून शाकाहारी व मांसाहारी खवय्यांसाठी फेस्टिवल ही पर्वणी ठरणार आहे. विशेष म्हणजे या फेस्टिवलमध्ये चिकू फळ व त्यापासून तयार होणार्‍या उत्पादनांच्या विक्रीसाठी व प्रदर्शनासाठी “चिकू पॅवेलियन” असा विशेष कट्टा थाटण्यात येणार असून त्यामध्ये किमान १५ बागायतदार, चिकू पदार्थांचे उत्पादन करणारे गृह उद्योग व महिला उद्योगांना स्थान देण्यात येणार येणार आहे. या शिवाय स्थानिक शेतकरी व बागायतदारांसाठी कृषीधन प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या सोबतीने या महोत्सवात स्थानिक कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

याच बरोबरीने महोत्सवात आदिवासी संस्कृती, नृत्य व. चित्रकला, मातीची भांडी बनवणे, टोपल्या व नारळाच्या झावळ्या विणणे, हस्तकला इत्यादी कार्यशाळांचा समावेश असून त्यामध्ये व्यंगचित्र (कॅरीकेज) बनवणे याचा देखील समावेश आहे. या महोत्सवात कलागुणांना वाव देणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असून लहान मुलांसाठी पपेट शो, मेट्रो मॅजिक व इतर कार्यक्रमांचा समावेश आहे. या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

First Published on: February 17, 2023 9:46 PM
Exit mobile version