अवजड वाहनांचा अवघड प्रश्न

अवजड वाहनांचा अवघड प्रश्न

वाणगाव: देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतीपैकी एक असलेल्या पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील बोईसर परिसरातील मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांच्या बेकायदा पार्कींगचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालला असून सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी सोबतच अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे.बेकायदा पार्कींगच्या या प्रश्नांकडे वाहतूक पोलिसांसोबत एमआयडीसी आणि स्थानिक ग्रामपंचायतीचे देखील दुर्लक्ष होताना दिसत आहे.ग्रामपंचायत फक्त नो पार्कींगचे फलक लावून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये पोलाद,अभियांत्रीकी,औषधे,रासायनिक आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील जवळपास १२०० कारखाने असून दोन ते अडीच लाखांच्या संख्येत कामगार काम करीत आहेत.या कारखान्यांमध्ये कच्चा माल आणि तयार मालाची वाहतूक करण्यासाठी रोज हजारो ट्रेलर्स,कंटेनर्स,ट्रक्स आणि टँकर सारखी अवजड वाहनांची वाहतूक होत असते.

या वाहनांच्या पार्कींगसाठी वाहन तळ नसल्याने ही अवजड वाहने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांबरोबरच बोईसर,सरावली या ग्रामपंचायत हद्दीतील नागरी क्षेत्र असलेल्या रस्त्यांवर तसेच बोईसर-चिल्हार या मुख्य मार्गावर खैरापाडा,बेटेगाव आणि मान या गावांच्या हद्दीत दोन्ही बाजूस बेकायदशीरपणे पार्कींग करत असल्याने सकाळी कारखान्यात कामावर जाण्यासाठी तसेच संध्याकाळी कामावरून घरी परतणार्‍या लाखो कामगारांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते.संधाकाळी तसेच रात्रीच्या अंधारात या अवजड वाहनांना मागच्या बाजूने धडकून अनेक चारचाकी आणि मोटारसायकल चालकांचे अपघात होत आहेत.त्यातच औद्योगिक वसाहत परिसर आणि बोईसरचे मुख्य चौक,उड्डाणपूल आणि रस्त्यावरील पथदिवे रात्रीच्या सुमारास बंद अवस्थेत असल्याने संपूर्ण अंधाराचे साम्राज्य निर्माण होत असून काळोख्या अंधारात वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. बोईसर चिल्हार रस्त्यावरील खैरापाडा उड्डाणपूल उतरल्यानंतर येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवजड वाहने धोकादायक रीतीने बेकायदा पार्कींग केलेली उभी असतात.यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

बॉक्स

ट्रक टर्मिनलच्या जागेवर अतिक्रमण-
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ट्रक टर्मिनलच्या आरक्षित जागेवर अनधिकृत गाळे,टपर्‍या आणि झोपड्यांनी अतिक्रमण केल्याने या जागेचा वाहनतळासाठी वापर फारसा होताना दिसत नाही.ही जागा पार्कींगसाठी सोयीची नसल्याने बहुसंख्य अवजड वाहने रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पार्किंग करून लावली जातात.औद्योगिक क्षेत्रातील बॉम्बे रेयान कंपनीसमोर असलेला मोकळा भूखंड पर्यायी वाहनतळासाठी देण्याची केलेली मागणी औद्योगिक विकास महामंडळाकडे अनेक वर्षे धुळखात पडून आहे.

कोट-
बोईसर तारापूर परिसरात रस्त्यावरील अवैध पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.रस्त्यावर बेकायदा उभ्या वाहनांना धडकून रोज लहान मोठे अपघात होत आहेत. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील ट्रक टर्मिनलला बॉम्बे रेयॉन कंपनीसमोरील जागा मिळावी म्हणून मी एमआयडीसी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत असून ही जागा मिळाल्यास पार्किंगचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

जगदीश धोडी
शिवसेना उपजिल्हाप्रमुख, पालघर

First Published on: September 8, 2022 5:42 PM
Exit mobile version