महापालिकेच्या शाळेत डिजिटल वर्ग

महापालिकेच्या शाळेत डिजिटल वर्ग

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहिली असून शैक्षणिक दर्जा आणखी उंचावण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या व सबंधित अधिकार्‍यांच्या प्रयत्नाने दिवाळी सुट्टीनंतर महापालिकेतील शाळांमध्ये ५० वर्ग हे डिजिटल स्वरूपात सुरू करण्यात येणार आहेत. या डिजिटल वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती ही चित्रफित किंवा फोटोच्या स्वरूपात शिकवण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी नवनवीन अभ्यासक्रमदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर डिजिटल वर्ग हे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती व सेमी इंग्रजी याभाषेत सुरू करण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न या डिजिटल स्वरूपाच्या माध्यमातून सहज सोडवता येणार आहेत. या वर्गांमुळे मिरा भाईंदर महापालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर होणार आहे. तसेच शिक्षकांनादेखील या वर्गांचे प्रशिक्षण देण्यात आले असून वर्गांच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काय शिकवले व किती वेळ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दिला याचा अहवालदेखील ऑनलाईन स्वरूपात जतन करण्यात येणार आहे. या वर्गांच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी थेट संपर्क साधता येणार असल्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशी माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली.पालिका कार्यक्षेत्रातील महापालिका शाळांची गुणवत्ता सुधारणा करण्याकरता आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार विविध उपाय योजना राबवण्यात येत आहेत. शाळेतील वर्गात रंगरंगोटी, विविध संकल्पनेतून साकारण्यात आलेली भित्तीचित्रे, नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके, संगणक कक्ष या सर्वांच्या माध्यमातून शाळेची व शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचे मिरा भाईंदर महापालिकेने ठरवले आहे.

First Published on: October 25, 2022 9:25 PM
Exit mobile version