ग्लोबलवार्मिंगच्या समस्येवर पर्यावरणपूरक घरांचा तोडगा

ग्लोबलवार्मिंगच्या समस्येवर पर्यावरणपूरक घरांचा तोडगा

सफाळे: घर असावे घरा सारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती!
कवियत्री विमल लिमये यांची ही रचना आहे. या कवितेत भिंती, खिडक्या, दरवाजे आणि छप्पर इ. घराला घरपण येत नाही असे त्यांना अभिप्रेत आहे. मात्र हल्ली घर बांधताना ते पर्यावरणपूरकच असावे असा ट्रेंड आहे. त्यासाठी वास्तुकलेचे शिक्षण घेतल्यानंतर तीन युवांनी डिझाइन जत्रा या संस्थेची स्थापना केली. डहाणूतील मुरबाड या गावी स्थानिक पातळीवर उपलब्ध लाकूड, माती इ. वस्तूंपासून घर निर्मितीचे तंत्र शिकवले जाते. दरम्यान ग्लोबलवार्मिंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अशा पर्यावरणपूरक घरांना पसंती मिळू लागली असून देशभरातून प्रशिक्षणार्थी दाखल होतात. शासनस्तरावरही त्यांच्या उपक्रमाची दखल घेतली जाते हे विशेष आहे.

मुंबईतील प्रभादेवी येथील रचनासंसद अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर येथून 2013 साली प्रतीक धानमेर(डहाणू), शार्दूल पाटील (सफाळे) आणि मुंबईची विनिता कौर चिरागिया हे त्रिकुट शिक्षण घेऊन बाहेर पडले. त्यांनी डिझाईन जत्रा या संस्थेची स्थापना करून पारंपरिक माती, दगड, चुना, लाकूड, बांबू, भुसा, तूस, काथ्या इ. वस्तूंपासून वस्तूंपासून घरनिर्मितीचे कार्य हाती घेतले. गाव हा त्यांचा कार्यक्षेत्राचा केंद्रबिंदू असून अत्यल्प दरात स्थानिक पातळीवर स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने त्यांनी घर बांधणीचे प्रशिक्षण सुरू केले. त्याचा लाभ स्थानिकांना स्वयं रोजगार निर्मितीसाठी झालाच, शिवाय पर्यावरणपूरक तंत्र आत्मसात केलेल्यांच्या हातांना काम मिळू लागले आहे.

त्यापैकी प्रतिक धानमेहेर या 33 वर्षीय तरुणाने स्वतःचे टुमदार घर या पद्धतीने बांधताना त्याला आधुनिक तंत्राची जोड दिली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 25 घरे बांधली आहेत. त्यांच्या गावांचा शाश्वत विकासाच्या या कार्याची दखल मुंबई, नागपूर या महानगरांसह देशभरातील विविध राज्यातील वास्तुकला महाविद्यालयांनी घेतली आहेत. वर्षभर होतकरू विद्यार्थी हे तंत्र शिकसण्यासाठी डहाणू तालुक्यातील चारोटी राष्ट्रीय महामार्गालगतच्या मुरबाड या गावी येऊन अनुभवाने समृद्ध होत आहेत. दरम्यान ऍग्रो टूरिझम, फार्म हाऊस ही पर्यावरणाशी सांगड घालणारे पर्यटनाचे अविभाज्य घटक बनलेल्या गृह बांधणीसाठी मागणी वाढल्याचे प्रतिक सांगतो. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जव्हार तालुक्यात तसेच कर्जत तालुक्यात सिडको, गडचिरोली येथे समाजमंदिर बांधण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासनाशी त्यांनी कंसल्ट केल्याचे त्याने सांगितले. ही संस्था दहा वर्षांची झाली असून त्यांचे हे संस्थात्मक कार्य पर्यावरणपूरक तर आहेच, त्यामुळे स्थानिकांना स्वस्त:त घर निर्मिती व प्रशिक्षणामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.

 

“इकोफ्रेंडली घरे बेडरूम, लिव्हिंगरूम, स्वयंपाकघर, शौचालय इ. आधुनिक सुविधांनीयुक्त बांधता येतात. घरात उन्हाळ्यात थंडावा तर अन्य ऋतूत उबदारपणा व उत्तम प्रकाशव्यवस्था इ. प्राधान्य दिले जाते. शाश्वत विकास हा पारंपरिक पद्धतीने जोपासण्यासह पर्यावरणपूरक पाहिजे. ग्रामीण व आदिवासी तरुणांना स्वयंरोजगार तसेच नागरिकांना पर्यावरणपूरक घर उपलब्ध होते.”
– प्रतीक धानमेर (डिझाईन जत्रा, संस्थापक)

First Published on: April 11, 2023 9:25 PM
Exit mobile version