ग्रामपंचायत निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी चढाओढ

ग्रामपंचायत निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी चढाओढ

जव्हार : ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच सर्वच पक्ष संघटनेतून उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली आहे. उमेदवारांकरिता गावोगावी फिरून आवश्यक कागदपत्रे जमा करतानाचे चित्र दिसत आहे. शिंदे सरकारने सदस्यांमधून सरपंच हा निर्णय बदलवून थेट सरपंच हा निर्णय घेतल्याने सदस्य उमेदवार शोधणे कठीण झाले आहे. शिवाय ,सदस्य पदांकरिता उमेदवारांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. तर सदस्य बनून काय करायचे? असा नाराजीचा सूरही उमटत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. ग्रामीण भागात गाव पातळीवर राजकीय रंग वाढलेला दिसून येत असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सरपंच होण्याकरिता सातवी पास शिक्षणाची अट ठेवण्यात आली असून पन्नास टक्के महिला आरक्षण हा देखील राजकीय पक्ष संघटने करिता संघर्षाचा विषय असून शिक्षित उमेदवार आणि राखीव जागेसाठी असणारा उमेदवार याकरिता लागणारे दस्तावेज जमा करणे म्हणजे अधिक शिताफीचे असल्याचे बोलण्यात येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीने गाव पातळीवरील वातावरण तापले असून, वार्डावार्डात, चर्चासत्र व रात्री पाळीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. जुळवाजुळवीचे समीकरण करीत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणूक गाव पातळीवरील मुत्सद्दी राजकारणी लोकांचे मानले जाते होते. परंतु आता मात्र तसे दिसून येत नसून ग्रामपंचायत निवडणुकीकडे युवकांचा कल अधिक वाढलेला दिसून येत आहे. गावपातळीवरील राजकारणात युवक अधिक सक्रिय झाले असून, राजकीय आखाड्यात उतरल्याचे निदर्शनास येत आहे.

First Published on: September 19, 2022 9:10 PM
Exit mobile version