अवैध ओव्हरलोड वाहतूक कोणाच्या वजनाने पुन्हा सुरू ?

अवैध ओव्हरलोड वाहतूक कोणाच्या वजनाने पुन्हा सुरू ?

डहाणू: मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या आपल्या वहन क्षमतेपेक्षा जास्तीचे वजन घेऊन प्रवास करणारी ओव्हरलोड वाहने दापचरी सीमा तपासणी नाका चुकवून तलासरी-सायवन-कासा अश्या आडमार्गाने प्रवास करत असल्याचे वृत्त आपलं महानगरने वेळोवेळी प्रसिध्द केले होते. त्याअनुषंगाने सदरची अवैध वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अवैध चोरटी वाहतूक पुन्हा सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपलं महानगर च्या पाठपुराव्यानंतर मध्यंतरी कासा पोलीस स्टेशनमार्फत अशा वाहनांना अडवून आरटीओच्या ताब्यात देऊन कारवाई केली जात होती. त्यामुळे राज्य मार्गावरून होणार्‍या वाहतुकीला चाप बसला होता. मात्र, आता पुन्हा वाहतूक सुरू झाली असून संबंधित शासकीय यंत्रणा, आरटीओ सोबत कासा व तलासरी पोलीस देखील ह्याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमेवरील दापचरी सीमा तपासणी नाक्यावर मालवाहू वाहनांची तपासणी केली जाते. येथे वाहनांची कागदपत्रे आणि वजन तपासून दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. सीमा तपासणी नाक्यावरील दंडात्मक कारवाईला बगल देण्यासाठी महामार्गावरून अवैध रित्या प्रवास करणारी वाहने महाराष्ट्रात प्रवेश करताना तलासरी वरून व महाराष्ट्रातून गुजरातला जाताना कासा येथून राज्य मार्गाने प्रवास करत असतात. भरधाव वेगात धावणार्‍या ओव्हरलोड वाहनांच्या वाहतुकीमुळे दोन पदरी राज्य मार्गावर प्रवास करणार्‍या स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. छोटी वाहने आणि मोटारसायकल चालकांना तर ओव्हरलोड वाहनांच्या गर्दीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. अशा अवैध ओव्हरलोड वाहनांवर संबंधित शासकीय यंत्रणा अर्थकारणाने दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी संबंधित यंत्रणांशी अर्थपूर्ण संबंध असणारे काही स्थानिक लोक मध्यस्ती करत असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली आहे. अशा मध्यास्तींकडून आधी धुंदलवाडी-उधवा-तलासरी हा राज्यमार्ग वापरण्यात येत होता. मात्र, रोजच्या शेकडो वाहनांच्या वाहतुकीमुळे धुंदलवाडी राज्यमार्गाची अक्षरशा चाळण झाली असून सदर राज्यमार्ग छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी देखील अयोग्य ठरत आहे. अशात अवजड वाहतुकीसाठी दुसरा पर्याय म्हणून कासा -सायवन- उधवा- तलासरी ह्या राज्य मार्गाचा वापर सध्या सुरू करण्यात आला आहे. धुंदलवाडी उधवा रस्त्याची चाळण केल्यानंतर अवजड वाहनांचा मोर्चा आता कासा सायवन रोड कडे वळला असून, शासकीय यंत्रणांच्या आशीर्वादाने लवकरच ह्या राज्य मार्गाची देखील दुरवस्था होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चौकट
ओव्हरलोड वाहनांच्या अपघातामुळे मागे धुंदलवाडी -उधवा राज्यमार्ग सलग पाच दिवस वाहतुकीसाठी बंद होता. त्यावेळी अवैध वाहतुकीचा प्रश्न चव्हाट्यावर आल्यामुळे काही काळ सदरची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा अवैध वाहतूक पूर्ववत झाली असून, अवैध वाहतुकीला संबंधित यंत्रणांचाच आशीर्वाद मिळत असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. काही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी देखील ह्या अवैध अवजड वाहतुकी विरूध्द आवाज उठवला होता. मात्र त्यांना देखील डावलून सदरची अवैध वाहतूक जशास तशी सुरू आहे. त्यामुळे ओव्हरलोड वाहनांच्या वाहतुकीवर बड्या हस्तींचा वरदहस्त असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First Published on: September 16, 2022 8:30 PM
Exit mobile version