पितृपंधरावड्यात भासतेय काकस्पर्शाची उणीव…!

पितृपंधरावड्यात भासतेय काकस्पर्शाची उणीव…!

आजच्या आधुनिक युगातही पितरांसाठी नैवेद्य घराच्या कौलांवर, पत्र्यांवरही ठेवले जातात. पिढ्यानपिढ्या या प्रथा परंपरेचा उलगडा होत नसला तरी हा पितृपंधरवडा मात्र मोठ्या श्रद्धेने प्रत्येक घरात तसेच खेड्या-पाड्यात आजही कायम पाळला जातो. पितृपंधरवडा व्यतिरिक्त कावळ्यांची कुणालाही फारशी आठवण येत नाही. मात्र या दिवसांत त्यांची कावकाव ऐकण्यासाठी आणि आपण टाकलेल्या नैवेद्यामध्ये कावळ्यांनी चोच लावण्यासाठी त्यांची तासनतास घरांच्या छतावर वाट पाहिली जाते. गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपंधरवडा सुरू होतो. या दिवसात आपल्या पूर्वजांनी नैवेद्य (घास) ठेवण्याची फार जुनी रूढी-परंपरा जुन्या काळापासून आजही चालत आली आहे. ही परंपरा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मानली जात आहे. तसेच शहरी भागातही ठिकठिकाणी ही परंपरा राखली जाते. या दिवसात पितरांना अर्थात कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या आवडीचे खाद्यपदार्थ कावळ्यांच्या नावाने वाढण्याची जुनी परंपरा आहे. पितृ पौर्णिमेला या परंपरेचा प्रारंभ होतो आणि पितृ आमवस्येला त्याची सांगता केली जाते.

या पितृपंधरवाड्याच्या दरम्यान आपल्या घरातील पूर्वजांना त्यांच्या तिथीनुसार घास देण्याची प्रथा परंपरा असल्याने या दिवसांत कावळ्यांना अधिक महत्व प्राप्त होते. कावळ्याने जर नैवेद्य घेतला नाही किंवा घेण्यास उशीर झाला तरी घरातील कुणीही माणसे जेवत नाहीत. आजही बऱ्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहे. एरव्ही उकिरड्यावर गुजराण करणारा हा पक्षी या पितृपंधरवड्यात खाऊन सुस्तावलेला दिसून येतो. मात्र, सद्या या कावळ्यांची संख्या कमी झालेली दिसून येते. पितरांच्या घासाला शिवण्यासाठी कावळ्यांना साद घालूनही ते फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे बऱ्याचदा केवळ साकडे घालून जेवण आटपावे लागत आहे. यावेळी घरातल्या बुजुर्गनाही दुःख वाटते.

कावळा हा पक्षी इतरवेळी उपद्रवी, अस्पृश्य समजला जातो. उकिरड्यावर आपले खाद्य शोधणारा, मेलेले प्राणी खाणारा कावळा सहसा कुणालाच आवडत नाही. त्याचे ओरडणे कर्कश असल्याने त्यांना लोकांकडून तुच्छेतेची वागणूक मिळते. मात्र, याच कावळ्यांना पितृपंधरवडा सुरू झाला की सुगीचे दिवस येतात.परंतु गेल्या काही दिवसांत याच कावळ्यांची संख्या कमी होऊ लागल्याने काकस्पर्श दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालला आहे.

(तुकाराम रोकडे – हे खोडाळाचे वार्ताहर आहेत)

हेही वाचा –

ईडीच्या मुंबई विभागाचे सहसंचालक सत्यव्रत कुमार यांची बदली

First Published on: September 29, 2021 4:35 PM
Exit mobile version