शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारतींवर दुरूस्तीसाठी लाखोंचा खर्च

शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारतींवर दुरूस्तीसाठी लाखोंचा खर्च

वाडा शहरातील विविध शासकीय कार्यालयांच्या इमारती जुनाट व जीर्ण झालेल्या आहेत. काहीं इमारतींना तर ११० ते ११५ वर्षे झालेली असतानाही त्या इमारतीची प्रत्येक वर्षी दुरूस्ती केली जाते. या दुरूस्तीवर लाखोंची उड्डाणे घेतली जात आहेत. मात्र नवीन इमारतीचा प्रस्ताव न बनवता नेहमीच दुरूस्ती केली जात असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुरूस्तीच्या नावाखाली लाखोंचा मलिदा खाल्ला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. वाडा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे अनेक शासकीय इमारती आहेत. यामध्ये तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, कृषी विभाग, वनविभाग, मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहाय्यक निंबधक विभाग आदी कार्यालये आहेत. यातील बरिचशी कार्यालये ही शंभर वर्षे जुनी आहेत. यामध्ये तहसीलदार कार्यालय, पोलीस ठाणे, मंडळ अधिकारी कार्यालय, मुद्रांक शुल्क विभाग यांचा समावेश आहे.

तहसीलदार कार्यालयाची जागा कमी पडायची म्हणून तत्कालीन तहसीलदारांनी कार्यालयाला लागूनच एक खोली वाढवली. तर पोलीस ठाण्याचीही तिच गत. या कार्यालयाची जागा कमी पडायची म्हणून तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी येथे श्रमदानातून एक नवीन इमारत उभी केली. या नवीन इमारतीत कनिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र दालने, सभागृह, महिला पोलीस कर्मचार्‍यांसाठी स्वंतत्र खोली आदी व्यवस्था करण्यात आली. मात्र जुनी इमारत आहे ती तशीच आहे.

तहसील व पोलीस ठाणे या इमारतींना पावसाळ्यात गळती लागते. त्यामुळे या दोन्ही इमारतींवर पत्रे टाकण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असून या दोन्ही इमारतींच्या दुरूस्तीसाठी लाखो रूपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. त्याच त्याच इमारतींची प्रत्येक वर्षी दुरूस्ती करून लाखोंचा खर्च केला जातो. मात्र नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव बनवला जात नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नेहमीच दुरूस्ती मध्ये लाखो रूपयांचा मलिदा अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांना मिळत असल्याचा आरोप नागरिक करत असून या इमारती म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्याचे बोलले जात आहे.

पालघर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे न करताच बिले काढली जात असल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा जुन्याच इमारतीवर प्रत्येक वर्षी लाखोंचा खर्च केला जात असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. तहसील कार्यालय व पोलीस ठाणे दुरूस्तीच्या माहिती संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल बरसट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा –

UPSC 2021 Final Result : यंदाच्या युपीएससी परीक्षेत मुलींची बाजी; श्रुती शर्मा देशात पहिली

First Published on: May 30, 2022 4:07 PM
Exit mobile version