मानधनवाढीसाठी नर्सेस आक्रमक; पालिका मुख्यालयासमोर आंदोलन

मानधनवाढीसाठी नर्सेस आक्रमक; पालिका मुख्यालयासमोर आंदोलन

गेल्या सात-आठ वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर कंत्राटी पद्धतीवर काम करत असलेल्या वसई विरार महापालिकेच्या नर्सेसनी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. यासंबंधीची सर्व माहिती घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढू असे आश्वासन आयुक्त गंगाथरन डी. यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागात सुमारे दोनशे नर्सेस गेल्या सात-आठ वर्षांपासून अगदी तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. कोरोना काळात जीव धोक्यात काम करूनही गेल्या अकरा महिन्यांचा कोविड भत्ता म्हणून दिले जाणारे दोनशे रुपयेही महापालिकेने दिलेले नाहीत. त्यामुळे या नर्सेसनी शुक्रवारी सकाळीच महापालिका मुख्यालयासमोर भर पावसात आंदोलन केले.

महापालिकेच्या नर्सेस रुग्णांना चांगली सेवा देत आहेत. कोरोना काळातही त्यांनी जीवाची पर्वा न करता सेवा देण्याचे काम सुरुच ठेवले आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठी बहुजन विकास आघाडी प्रयत्न करील.
– प्रविण शेट्टी, महापौर

आयुक्त गंगाथरन डी यांची भेट होत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली होती. पण, दुपारी आयुक्तांशी भेट झाली. याभेटीत आयुक्तांनी नर्सेसची म्हणणे ऐकून घेतले. याप्रकरणी सविस्तर माहिती घेऊन योग्य तो तोडगा काढू, असे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले.

राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही वस्तूस्थिती मांडून नर्सेसना न्याय मिळवून दिला जाईल.
– हितेश जाधव, जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष

महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर जवळपास दोनशे नर्सेस काम करत असून त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. या नर्सेसने दरमहा १९ हजार ७०० रुपये मानधन मिळते. पीएफ कापून त्यांच्या हातात १७ हजार १०० रुपये मिळतात. दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई महापालिकेतील नर्सेसना ३५ हजार रुपये मानधन मिळते. राज्य शासनाच्या नर्सेना ३४ हजार ८०० रुपये मानधन मिळते. त्यामुळे मानधन मिळावे, यासाठी नर्सेसनी अनेकदा महापालिकेकडे लेखी मागणीसुद्धा केलेली आहे. पण, ती मान्य होत नसल्याने अखेर शुक्रवारी त्यांनी आंदोलन केले.
या आंदोलनाला बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिला असून माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा महिला व बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी दिले आहे.

हेही वाचा –

Fake Covid-19 Vaccination: मुंबईनंतर ठाण्यातही बनावट लसीकरण; लाखोंचा भुर्दंड

First Published on: June 26, 2021 12:44 AM
Exit mobile version