ओमान देशात घरकामाकरता डांबून ठेवलेल्या भारतीय महिलेची सुटका

ओमान देशात घरकामाकरता  डांबून ठेवलेल्या भारतीय महिलेची सुटका

वसई : परदेशात घरकामाला नेलेल्या महिलेला घरात डांबून ठेवले होते. त्याची तक्रार आल्यानंतर वसई पोलिसांनी महिलेची तिथून सुटका करून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. वसई कोळीवाड्यात राहणार्‍या लीलावती पारस वर्मा यांची मुलगी अंजु पारस वर्मा ( वय ३० वर्षे,) ही दिनांक २५/०८/२०२२ रोजी मस्कत, ओमान या देशामध्ये नोकरीसाठी गेली होती. परंतु सध्या तिला तेथे नोकरी करताना त्रास होत असून तिला तेथे नोकरी करायची नाही व तिला परत भारतात यायचे आहे. परंतु तिचा पासपोर्ट व व्हिसा ओमान देशातील एजंट प्रसन्ना याच्याकडे जमा असून तो तिला व्हिसा व पासपोर्ट देण्यास नकार देत असून ती तीन दिवसांपासून मस्कत, ओमान एअरपोर्ट येथे थांबली आहे, अशी तक्रार लिलावती यांनी वसई पोलीस ठाण्यात केली होती.

वसई पोलीस ठाण्यातून विशेष शाखा, पारपत्र विभाग यांना ही माहिती मिळाल्यावर पारपत्र विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली ओमान, मस्कत येथे अडकलेल्या अंजु पारस वर्मा यांच्याशी संपर्क केला. तेव्हा एजंट प्रसन्ना याने अंजुचा व्हिसा ०२ वर्षाकरिता वाढवला असून त्यासाठी त्याचे पैसे खर्च झाल्याने तो तिला पासपोर्ट व व्हिसा देत नाही, अशी माहिती मिळाली. त्यानंतर पारपत्र विभागाने ओमानमधील भारतीय दुतावासाला इमेल करुन पीडित अंजु वर्माला मदत करण्याची विनंती केली व वरील सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी मदत करण्याची व तिला आश्रय देण्याची विनंती मान्य केल्याने अंजु वर्माला ओमानमधील भारतीय दुतावासाजवळ पोहोचण्यास सांगितले.
त्यानुसार दुतावासाच्या अधिकार्‍यांनी तिच्या व्हिसा स्पॉन्सरशी संपर्क करुन सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन तेथील कायद्याप्रमाणे लेबर कोर्टात व्हिसा रदद केला व दिनांक ०९/०१/२०२३ रोजी अंजू वर्मा ही सुखरुप भारतात पोहचल्यानंतर तिला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

First Published on: January 12, 2023 10:04 PM
Exit mobile version