सागरपुत्र शुभम वनमाळी सर्वोच्च तेनझिंग नोर्गे पुरस्काराने सन्मानित

सागरपुत्र शुभम वनमाळी सर्वोच्च तेनझिंग नोर्गे पुरस्काराने सन्मानित

बोईसर: महाराष्ट्राचा सागरपुत्र शुभम धनंजय वनमाळी याला काल ३० नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते साहसी क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा २०२१ सालचा तेनझिंग नोर्गे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शुभम धनंजय वनमाळी हा मूळचा डहाणू तालुक्यातील कासा गावचा असून सध्या आपल्या कुटुंबियासहीत नवी मुंबई येथील नेरूळ येथे राहत आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू असणार्‍या शुभमने जगातील जगप्रसिद्ध इंग्लिश खाडी, जिब्राल्टरची सामुद्रधुनी, कॅटलीना खाडी, मॅनहटन मॅरेथॉन स्विम, राऊंड ट्रीप एन्जल आयलँड स्विम, परहेन्शियन आयलँड मॅरेथॉन स्लिम, राजभवन,गेट वे ऑफ इंडीया ते डहाणू,बोर्डी ते डहाणू, वाळकेश्वर ते गेटवे ऑफ इंडिया, धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया आणि गेटवे ऑफ इंडिया ते धरमतर अशा विविध राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खाड्या पोहून विक्रम केलेले आहेत. येत्या महिनाभरात गोवा ते मुंबई असा ४१३ किलोमीटरचा सागरी प्रवास ११ ते १५ दिवसात पोहून पार करण्याचा धाडसी मानस शुभमने केला आहे.

शिवछत्रपती पुरस्काराने शुभमचा गौरव
शुभमच्या या जलतरण प्रकारातील यशाबद्दल त्याला २०१८-२०१९ सालचा महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले आहे.शुभमने मागील वर्षी गेट वे ऑफ इंडीया ते पालघर जिल्ह्यातील डहाणू हे १४० किमी सागरी अंतर पार करण्याचा धाडसी पराक्रम केला होता.

शुभमचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका
शुभम हा मुळचा डहाणू तालुक्यातील कासा गावचा असून त्याच्या संपूर्ण कुटुंबाला खेळाची पार्श्वभूमी लाभली आहे. त्याचे वडील धनंजय वनमाळी हे राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉलपटू असून आई दिपीका वनमाळी या कबड्डीमधील राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत. तर बहीण देखील शुभमच्या पावलावर पाऊल ठेवून राष्ट्रीय जलतरणपटू असून सध्या दिल्ली येथे प्रशिक्षण घेत आहे. शुभमचे माध्यमिक शिक्षण रायन इंटरनॅशनल स्कूल येथे झाले असून त्याने नेरूळ येथील स्टर्लिंग कॉलेजमधून आपले बीएमएसचे शिक्षण पूर्ण केले आहे.राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेत घवघवीत यश मिळवल्यानंतर शुभमने ४ ऑगस्ट २०१४ रोजी युरोपातील आव्हानात्मक इंग्लिश खाडी आणि २० ऑगस्ट २०१४ रोजी जिब्राल्टर सामुद्रधुनी आणि न्यूयार्क येथील मॅनहॅटन आयलंड पोहत पार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील यशाचा झेंडा रोवला होता.

First Published on: December 1, 2022 10:22 PM
Exit mobile version