धक्कादायक! रस्ता नसल्याने महिलेची घरातच प्रसूती, जुळ्या बालकांचा उपचारांअभावी मृत्यू

धक्कादायक! रस्ता नसल्याने महिलेची घरातच प्रसूती, जुळ्या बालकांचा उपचारांअभावी मृत्यू
मोखाडा (ज्ञानेश्वर पालवे)- देशात अमृतमहोत्सव साजरा होत असताना मोखाडा तालुक्यातील मरकटवाडीला रस्ता नसल्याने, एका गरोदर महिलेची घरातच प्रसूती करण्याची वेळ आली आहे. तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र, वैद्यकीय उपचारांअभावी तिला आपली दोन्ही मुले गमवावी लागली आहेत. तसेच, मातेचीही प्रकृती गंभीर असून तिला 3 किलोमीटर डोंगर कपारीतून भरपावसात मुख्य रस्त्यावर आणले. तेथून तिला खोडाळा उपकेंद्रात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहे. (Shocking! Due to lack of road, woman gave birth at home, twins died due to lack of treatment)
मरकटवाडी येथील वंदना यशवंत बुधर ही महिला सात महिन्याची गरोदर होती, तिला अचानक शनिवारी प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या, कुटुंबीयांनी तत्काळ आशा सेविकेला संपर्क केला, आशा सेविकाही महिलेच्या घरी पोहोचली, तिने 108 एमबुलन्स सुद्धा बोलावली. मात्र मुख्य रस्ता ते मर्कटवाडी गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता. दरम्यान महिलेला खूपच वेदना होत होत्या, तिची प्रसूती घरातच झाली. तिने जुळ्या बालकांना जन्मही दिला मात्र सात महिन्याची प्रसूती असल्याने बालक कमकुवत होते, त्यांना रुग्णालयात तत्काळ दाखल करणे आवश्यक होते. पंरतु, काही वेळातच उपचारा अभावी दोन्ही बालकांनी प्राण सोडला.
महिलेची प्रकृती चिंताजनक
दरम्यान रक्तस्राव झाल्यामुळे महिलेची प्रकृती खालावत होती, तिला गावकऱ्यांनी झोळी करून डोंगर दऱ्या कपारीतून थेट 3 किमी अंतर पार करत मुख्य रस्त्यावर आणले. तेथून तिला एमबुलन्सद्वारे खोडाळा उपकेंद्रात दाखल करण्यात आले, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मोखाडापासून 30 ते 35 किमी अंतरावर दरी डोंगरात वसलेल्या बोटोशी ग्रामपंचायतमधील 50 घरे असलेल्या 226 लोकवस्ती, अंगणवाडी, इयत्ता पाचवी पर्यंत शाळा असलेल्या मर्कटवाडी व बोटोशी येथील 105 घरे  व 1 हजार 400 लोकसंख्येच्या गावात  आदिवासींना रस्त्या अभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. या गावात यापूर्वीही रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. दरम्यान 2 ऑगस्ट रोजी नवनिर्वाचित जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी या गावाची पाहणी केली होती, त्यांनी या गावात तातडीने रस्ता मंजूर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
आमची रस्त्याची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश तर दिले आहेत, मात्र ते सुस्त असलेले बांधकाम विभाग कधी पूर्ण करणार, अजून किती निष्पाप जीव जाणार अशा दुविधेत मर्कटवाडीवासीय जीवन कंठित असल्याचे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पवार यांनी सांगितले
First Published on: August 16, 2022 12:51 PM
Exit mobile version