रखडलेल्या बुलेट प्रकल्पाने पकडला वेग

रखडलेल्या बुलेट प्रकल्पाने पकडला वेग

बोईसर : राजकीय खोडा आणि भूसंपादन विरोधामुळे महाराष्ट्रात ब्रेक लागलेल्या बुलेट ट्रेन मार्गाच्या कामाला अखेर पुन्हा सुरूवात झाली आहे.पालघर जिल्ह्यातून जाणार्‍या बुलेट ट्रेन मार्गातील झाडे-झुडुपे,बांधकामे आणि इतर अडथळे हटवून जागा साफ सफाईचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच प्रत्यक्ष स्थापत्य कामांना देखील सुरूवात केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पाचे भूमीपूजन २०१७ साली करण्यात आले होते.गुजरात राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे जवळपास २५ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी सरकारने आवश्यक परवानग्या देताना अडवणूक केल्याने तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बाधित शेतकर्‍यांचा भूसंपादनाला झालेला विरोध यामुळे महाराष्ट्रात हा प्रकल्प चांगलाच रखडला होता.

जून २०२२ मध्ये राज्यात सत्तापालट होऊन शिंदे-फडणवीस सरकार येताच युद्धपातळीवर या प्रकल्पातील अडथळे दूर करून प्रलंबित कामांना गती देण्यात आली. मुंबई-अहमदाबाद या देशातील दोन प्रमुख शहरांना जोडणार्‍या एकूण ५०८.१७ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गाचे पालघर जिल्ह्यातील भुसंपादनाचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे.महाराष्ट्रातील मुंबई,ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमधून बुलेट ट्रेनचा एकूण १५५.७६ किमीचा मार्ग जात आहे. बुलेट ट्रेनच्या स्थानकांच्या इमारतींचे डिझाईन्स देखील नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार्‍या पालघर जिल्ह्यातील वैतरणा,सफाळे,केळवा,पालघर आणि बोईसर भागातील झाडे-झुडुपे,बाधित होणारी बांधकामे,विजेचे खांब आणि इतर अडथळे काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील स्थानके

बांद्रा -कुर्ला संकुल
ठाणे
विरार
बोईसर

First Published on: March 28, 2023 8:54 PM
Exit mobile version