डहाणूत सामुहिक विवाह सोहळ्यात वादळाचा शिरकाव

डहाणूत सामुहिक विवाह सोहळ्यात वादळाचा शिरकाव

डहाणू तालुक्यातील ऐना येथे शिवसेना आणि केसरी फाऊंडेशन यांच्या प्रयत्नाने आदिवासी समाजातील तब्बल १२५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा हजारो वऱ्हाडींच्या साक्षीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लग्नसोहळा सुरू असताना अचानक परिसरात मोठी वावटळ उठून लग्नाचा संपूर्ण मंडप उद्ध्वस्त झाला. यामध्ये चार जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आयोजकांनी संकटावर मात करत लग्नसोहळा उत्साहात पार पाडला. लग्न सोहळ्याला आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढान, शिवसेना डहाणू तालुका प्रमुख अशोक भोईर, पंचायत समिती उपसभापती पिंटू गहलासोबत अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

लग्न सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप कोसळला. परंतु मी व माझ्या सहकाऱ्यांनी विचार विनिमय करून सर्व जोडप्यांचे लग्न जेवणाच्या मंडपात लावून दिले. वादळी वाऱ्यामुळे फक्त लग्नाचा मंडप कोसळला होता. परंतु आम्ही लग्नसोहळा त्याच उत्साहात पार पाडला.
– सुशील चुरी, माजी कृषी सभापती तथा अध्यक्ष केसरी फाऊंडेशन

लग्न सोहळ्याची तयारी सुरू असताना अचानक मोठी वावटळ उठून लग्नाचा संपूर्ण मंडप उद्ध्वस्त झाला होता. मंडपाखाली असलेल्या लोकांची पळापळ झाली. तर यात चार जणांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. परंतु या अस्मानी संकटाने गडबडून न जाता आयोजक सुशील चुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परतेने जेवणासाठी बनवलेल्या मंडपात सर्व जोडप्यांचा विवाह सोहळा विधिवत पार पाडला. शिवसेना व केसरी फाउंडेशनच्या कार्याची सर्वत्र चर्चा सुरू असून नागरिकांनी आयोजकांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

मागील दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे असलेल्या टाळेबंदीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने अनेकांचे लग्न समारंभ रखडले होते. पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजालादेखील टाळेबंदीचा मोठा फटका बसला होता. त्याचप्रमाणे लग्न समारंभासाठी लागणारा खर्चही मोठा असल्यामुळे दिवशी समाजातील लग्नाला आलेले वधु-वर व त्यांचे कुटुंबिय हतबल झाले होते. अशातच त्यांना मदतीचा हात देत शिवसेना पालघर जिल्हा व पालघरचे माजी कृषी सभापती सुशील चुरी यांच्या केसरी फाऊंडेशनमार्फत पालघरमधील सहा तालुक्यातील तब्बल १२५ जोडप्यांच्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात आयोजकांकडून वधु-वरांना कपडे, कन्यादान व सर्व संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. सोबत पाहुणे व वऱ्हाडी मंडळींसाठी जेवणाचीही सोय करण्यात आली होती.

हेही वाचा –

नाना पटोलेंची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीची तक्रार, आता अजितदादा म्हणतात…

First Published on: May 16, 2022 2:45 PM
Exit mobile version