वादळी वारे, खवळलेल्या समुद्राचा बोटींना तडाखा

वादळी वारे, खवळलेल्या समुद्राचा बोटींना तडाखा

रविवारी पहाटे अचानक आलेला पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळल्याने त्याचा तडाखा उत्तन समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या बोटींना बसला. यात चार बोटींचे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. उत्तन परिसरातील समुद्रात ७०० बोटी असून त्यापैकी चार बोटींच्या नांगराची रस्सी तुटली. त्यात सर्वात जास्त जीवनशक्ती बोट तुटून नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री पावसासह वादळी वारे भाईंदरच्या उत्तन समुद्रकिनारी वाहू लागले. त्यामुळे रविवारी पहाटे समुद्र खवळला आणि लाटा सुद्धा जोराच्या होत्या. समुद्राला भांग पडलेला असल्याने उत्तन, पाली व चौक येथील बहुतांश मासेमारी बोटी किनाऱ्यावर लागलेल्या होत्या. पाऊस पडू लागल्याने काही मोठ्या बोटींवर खलाशी गेले होते. वादळाच्या तडाख्याने जीवनशक्ती बोट तुटली. त्या बोटीवर चार खलाशी होते. त्यांना दिक्सन सायमन तुलजी यांनी आपल्या बोटीतून सुखरुपणे किनाऱ्यावर आणले. मात्र, जीवनशक्ती बोटीच्या नांगराचा दोर तुटल्याने लाटाच्या तडाख्याने किनाऱ्यावरील खडकांना आदळून बोट फुटली. त्यामुळे चिंचक कुटुंबियाचे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

वादळाच्या तडाख्याने ग्रेगरी साकोल यांची प्राजक्ता तसेच पाली येथील ईश्वरदूत व चौक येथील जॉन पॉल या तीन बोटींचे दोर तुटून त्यांचीही मोठी हानी झाली आहे. हवामान खाते वा मत्स्य विभागाकडून या वादळाबाबत कोणतीच पूर्वसूचना मिळाली नव्हती. त्यामुळे अचानक आलेल्या वादळामुळे चार बोटमालकांच्या बोटीचे नुकसान झाले आहे. मच्छीमार नेते लिओ कोलासो व बर्नड डिमेलोंसह स्थानिक नगरसेविका शर्मिला गंडोली, हेलन गोविंद, एलायस बांड्या, माल्कम कासुघर आदींनी दुर्घटनाग्रस्त बोटींच्या नाखवा यांना केंद्र राज्य सरकारने मत्स्य विभागाने तातडीने मदत देण्याची मागणी केलेली आहे.

हेही वाचा –

Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील ५१ पोलिसांचा गौरव, ७ जणांना शौर्य; तर चौघांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

First Published on: January 25, 2022 8:51 PM
Exit mobile version