वादळाशी झुंज देणारे सहा खलाशी घरी परतले

वादळाशी झुंज देणारे सहा खलाशी घरी परतले

खोल समुद्रात मासेमारी करत असताना चक्रीवादळ आल्यानंतर खवळलेल्या समुद्रात तब्बल ३६ तास लाटा आणि वादळीवाऱ्यांशी झुंज देत भाईंदरच्या उत्तन गावातील सहा खलाशी सुखरुपपणे घरी परतल्याने कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शासनाच्या हवामान विभागाकडून सर्व मच्छीमार बोटींना धोक्याची सूचना देत त्यांना शनिवारपर्यंत तातडीने समुद्रकिनाऱ्यावर येण्याची सूचना देण्यात आली होती. उत्तन येथील न्यु हेल्प मेरी बोटीचे तांडेल शुक्रवारीच सकाळीच मच्छीमारी करण्यासाठी गेले होते. ते समुद्रात ४० नॉटिकल आतमध्ये गेले होते. त्यांच्या कुटुंबियांच्यासोबत शनिवारी सकाळी ८ वाजता त्यांचे बोलणे झाले. मात्र त्यानंतर खराब हवामानामुळे त्यांचा संपर्क तुटला होता. ते किनाऱ्याकडे निघून ३० नॉटिकल किनाऱ्याच्या दिशेने आले होते.

मात्र वादळ त्यांना किनाऱ्याकडे जाऊ देत नव्हते. उलट त्यांना ते समुद्रात घेऊन जात होते. तेंव्हा बोटीवरील तांडेल जस्टीन मिरांडा, खलाशी सुनील हंसदा, सहदेव बसरा, संजय हंसदा, सुभाष कोल्हे आणि सहदेव कोल्हे यांनी समुद्रात नांगर टाकून बोट स्थिर करण्याचा प्रयत्न केला. मात्र वादळामुळे तो नांगर तुटला होता. तेंव्हा दुसऱ्या छोट्या नांगराला दोरीने बांधून बोट कशी तशी स्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्यांच्या बोटीचे स्टेअरिंग तुटल्याने त्यांची किनाऱ्यावर पोहोचण्याची आशा सुटली होती. मात्र हिम्मत तुटली नसल्याने ३६ तास त्या वादळात लाटांच्या सहारे उपाशीपोटी आपल्या जीवन मरणाची लढाई लढत होते.

यावेळी त्यांनी एका बंद असलेल्या रिगवर आसरा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रचंड लाटा आणि वादळी वाऱ्यामुळे बोट तिथे न-थांबता डहाणूच्या दिशेने भरकटू लागली होती. दुसरीकडे, तुफान वारा असल्याने स्टोव्ह व गॅस पेटत नसल्याने दोन दिवस ते उपाशीपोटीच होते. काही बिस्कीटांवर त्यांना भूक भागवावी लागत होती. बोट बेपत्ता झाल्याने तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर त्यांचा शोध घेत होते. हवामान विभाग व मच्छीमार विभागांने गुगल आणि जीपीएसच्या मदतीने बोटीचे लोकेशन शोधले. खराब हवामानामुळ हेलिकॉप्टर त्यांच्यापर्यंत पोचू शकत नव्हते. अखेर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हेलिकॉप्टरने सहाही खलाशांना सुखरुपपणे समुद्रकिनारी आणले.

हेही वाचा –

ठाण्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने जोड्या जुळल्याच नाहीत

First Published on: May 22, 2021 1:11 PM
Exit mobile version