पाण्याच्या ‘खडखडा’टाचा आवाज अधिवेशनात

पाण्याच्या ‘खडखडा’टाचा आवाज अधिवेशनात

अतिक कोतवाल,जव्हार : जव्हार नगरोत्थान शहर विकास योजने अंतर्गत जव्हार शहराला मुबलक आणि शुद्ध, स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा याकरिता 17 कोटी रुपये खर्च करून खडखड धरणावरून पाणी उचल करण्याचे नियोजन सन २०१७ पासून सुरू केले. या पाच वर्षाच्या कालावधीत नगर परिषद स्तरावर अनेकदा कामाची मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होऊ न शकल्याने विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी मतदार संघातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा अभावी आक्रमक भूमिका घेत नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात या नळ पाणी योजनेच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून कारवाईची मागणी केली आहे.
खडखड नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण गावातील रस्ते खोदण्यात आले आहेत. पाईपलाईन जमिनीत टाकल्यानंतर रस्त्याला पडलेले खड्डे भरण्यासाठी आमच्या अंदाजपत्रकात ही बाब नाही असे कारण सांगून शहरातील चौका चौकात मोठ मोठाले खड्डे तसेच ठेवण्यात आले. या खड्ड्यात पावसाळ्यात पाणी साठून लहान बालके तथा वृद्ध नागरिक पडून जखमी झाले आहेत. परंतु नगरपरिषद प्रशासनाला याबाबतीत काहीही सोयर सुतक नसल्याने नागरिकांमधून नगरपरिषद प्रशासनाबाबत अतिशय तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. १९१९ ला नगर परिषद स्थापना झाल्यापासून एवढे खराब रस्ते जव्हार वासीयांनी कधी अनुभवले नाही याचा उल्लेख आमदारांनी आपल्या म्हणणे मांडताना केला.

First Published on: December 27, 2022 9:28 PM
Exit mobile version