कामणमध्ये कायमस्वरुपी तलाठीच मिळेना

कामणमध्ये कायमस्वरुपी तलाठीच मिळेना

वसईः वसई तालुक्यातील कामण तलाठी सजेला सद्यस्थितीत प्रभारी तलाठी दिला असून आठवड्यातून एक-दोन दिवसच तलाठी कार्यालयात उपलब्ध होत असल्यामुळे कामण परिसरातील खातेदार नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे कामण तलाठी सजेला कायमस्वरूपी तलाठीची नियुक्ती करण्याची मागणी भारतीय जनता पक्ष वसई रोड शहर उपाध्यक्ष महेश सरवणकर यांनी उपविभागीय अधिकारी वसई यांचेकडे केली आहे. कामण तलाठी सजेचा अतिरिक्त कार्यभार सद्यस्थितीत नारंगीच्या तलाठी अक्षता गायकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तलाठी अक्षता गायकर या कामण तलाठी कार्यालयात प्रभारी तलाठी म्हणून काम काम पहात आहेत. आठवड्यातून दोनच दिवस तलाठी अक्षता गायकर या कामण तलाठी कार्यालयात उपस्थित रहात आहेत. कामण सजेसाठी त्यांनी मंगळवार व गुरुवार असे दोन वार ठरवले आहेत. मात्र, मंगळवार व गुरुवारी तहसील कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात मिटींग लागल्यास तसेच मंगळवार व गुरुवार यादिवशी तलाठी अक्षता गायकर यांना शासकीय इतर कामे असल्यास त्या कामण तलाठी कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे ठरवून दिलेल्या वाराच्या दिवशीदेखील तलाठी उपलब्ध नसल्यामुळे कामण परिसरातील शेतकरी तसेच आदिवासी खातेदारांची मोठी गैरसोय होत आहे, याकडे सरवणकर यांनी लक्ष वेधले आहे.

वसई तालुक्यातील मोठ्या व महसूल वसुली जास्त असलेल्या तलाठी सजांपैकी कामण ही सजादेखील मोडत आहे. कामण तलाठी सजेमध्ये कामण, पोमण, देवदल, मोरी, शारजामोरी, नागले, शिलोत्तर ही गावे येत असून वाढत्या नागरिकरणाबरोबर सदर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा माती भराव, बेकायदा बांधकामे दिवसाढवळ्या सुरू असतात. कायमस्वरुपी तलाठीच जागावर नसल्याने बेकायदा माती भरावांकडे प्रभारी तलाठींचे दुर्लक्ष होत आहे. कामण सजेमध्ये महसूल वसुली उद्दिष्ट्य मोठ्या प्रमाणात आहे. पण, तलाठीअभावी महसूल वसुलीवर त्याचा परिणाम होऊन शासनाचा महसूल वसुली उद्दिष्ट्य पूर्ण होणे कठीण होण्याची शक्यता आहे.

First Published on: February 17, 2023 9:57 PM
Exit mobile version