मोखाड्यात भीषण पाणीटंचाई; तीन टँकरने पाच गावपाड्यांना होतोय पाणीपुरवठा

मोखाड्यात भीषण पाणीटंचाई; तीन टँकरने पाच गावपाड्यांना होतोय पाणीपुरवठा

मोखाड्यात उन्हाचा तडाखा सुरू होताच पाणीटंचाईला सुरूवात होते. यावर्षीही मोखाड्यात फेब्रुवारीच्या पंधरवाड्यात पाणीटंचाईला सुरूवात झाली आहे. शासनाने तालुक्यातील दापटी १, दापटी २, ठवळपाडा, हेदवाडी आणि आसे स्वामीनगर या पाच गावपाड्यांना तीन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेने यावर्षी पंधरा दिवस अगोदरच पाणीटंचाईला सुरूवात झाली असून उन्हाच्या तीव्रतेमुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरवर्षी मोखाड्यात २ हजार ७०० ते ३ हजार मी.मी. पावसाची नोंद होते. मात्र, खडकाळ आणि डोंगर उताराचा हा भाग असल्याने येथे भू-गर्भात पाणी न साठता ते वाहून जाते. त्यामुळे दरवर्षी तालुक्याला पाणीटंचाई भेडसावत असते. यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवाड्यातच पाणीटंचाईला सुरूवात झाली आहे. गेल्यावर्षी ९ मार्चला टंचाईग्रस्त गावपाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली. परिणामी, टंचाईग्रस्त गावपाड्यांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी पंचायत समितीकडे केली आहे.

त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस अगोदरच २४ फेब्रुवारीपासून तालुक्यातील डोंगर माथ्यावर असलेल्या अतिदुर्गम दापटी १ आणि दापटी २ या गावांना एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर ९ मार्चपासून आसे स्वामीनगर, ठवळपाडा आणि हेदवाडी येथे दोन टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केल्याची माहिती मोखाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता भांगरे यांनी दिली आहे. कुंडाचापाडा, भोवाडी, ब्राम्हणगांव, विकरीचापाडा आणि नावळ्याचापाडा या टंचाईग्रस्त गावपाड्यांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तालुक्यात ८७ गावपाड्यांना २३ टॅंकरद्वारे टंचाई काळात पाणीपुरवठा करण्यात आला होता.

(ज्ञानेश्वर पालवे हे मोखाड्याचे वार्ताहर आहेत.)

हेही वाचा –

UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशमध्ये विकास आणि सुशासनाला जनतेचा आशीर्वाद, योगी

First Published on: March 10, 2022 8:33 PM
Exit mobile version