कंपनीतील अपघातात एका कामगाराचा दुदैवी मृत्यू

कंपनीतील अपघातात एका कामगाराचा दुदैवी मृत्यू

वाडा : तालुक्यातील अबिटघर येथील सनशाईन पेपर टीच नावाच्या पुठ्ठा कंपनीत झालेल्या अपघातात एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कामगार अल्पवयीन असल्याची प्राथमिक महिती नातेवाईकांनी दिली असून याबाबत चौकशीची मागणी केली जात आहे. अनिकेत खांजोडे(वय-१७) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून तो अबिटघर ( मनाचा पाडा) गावातील रहिवासी होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार वडिलांसोबत हा तरुण वर्षभरापासून येथे काम करीत असून बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास काम करीत असताना अचानक पट्ट्यात अडकून त्याचा अपघात झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिकेतला रुग्णालयात नेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला.
अनिकेत अवघ्या १७ वर्षांचा असल्याचे नातेवाईकांनी सांगितले असून अल्पवयीन कामगाराला कंपनीत कामावर कसे ठेवले होते ,याबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी उपस्थित नातेवाईकांनी केली आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापक राहुल फणसे यांना विचारणा केली असता हा तरुण कंपनीत काम करीत नसून तो वडिलांसोबत आला होता असे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. याबाबत वाडा पोलीस ठाण्यात या कंपनीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली.

वाडा तालुक्यात असे वारंवार कंपन्यांमध्ये अपघात घडत आहेत.तरी देखील प्रशासनाकडून त्याची गंभीर दखल घेतली जात नाही.शिवाय अपघातग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अपघात ग्रस्त कामगार उघड्यावर पडत आहेत.म्हणून या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
– महेंद्र ठाकरे, अध्यक्ष, जिजाऊ कामगार संघटना

First Published on: September 29, 2022 8:45 PM
Exit mobile version