बारमाही वाहणाऱ्या पाच नद्या लाभलेला तालुका तहानलेलाच

बारमाही वाहणाऱ्या पाच नद्या लाभलेला तालुका तहानलेलाच
वाडा तालुक्यात बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, तानसा, पिंजाळ, देहर्जे, गारगाई या पाच नद्यांचे वरदान वाडा तालुक्याला लाभले आहे. शिवाय एक केंद्रीय राज्यमंत्री एक खासदार, तीन आमदार, असे लोकप्रतिनिधी असूनदेखील या पाण्याचा लाभ तालुक्याला होत नाही. तालुक्याला पाणी मिळवून देणारे लोकप्रतिनिधी न मिळाल्यामुळे तालुक्यातील अनेक गावातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन वणवण फिरावे लागत आहे. वाडा तालुक्यात १६८ खेडी व २०० हून अधिक पाडे आहेत. तर ८८ ग्रामपंचायती आहेत. आजमितीस तालुक्याची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक आहे. तालुक्यातील औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्येत वाढ होत आहे. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी समस्येचे निराकरण होत नाही. तालुक्यात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु या पाण्याचा लाभ या तालुक्याला मिळवून देणारे लोकप्रतिनिधी न मिळाल्याने वाडा तालुका कोरडा आहे.
वैतरणेचे दररोज लाखो लिटर पाणी कोका-कोला कंपनी १५ कि.मी. अंतरावरून घेते. मग पुरेसा निधी उपलब्ध केला तर येथील नागरिकांना ते का मिळू शकणार नाही, असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. नद्यांवर दहा किमी अंतरावर बंधारे बांधून पाणी अडवल्यास केवळ पिण्याचाच नाही, तर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटेल. तालुक्यातील दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या परळी, ओगदा, वरसाळे, सागमाळ, घोडसाखरे, फणसपाडा, जाधवपाडा, दिवेपाडा या गावांना भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. औद्योगिकीकरण व त्यामुळे वाढलेल्या वस्तीला पाणीपुरवठा करणे ही अनेक गावांची समस्या बनली आहे. कारखानदारांना सरकारने पाणी दिले नाही. त्यामुळे त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्चून उभारलेली कारखानदारी धोक्यात आली आहे. केवळ पाण्यामुळे उत्पादन कमी होत आहे, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा –

नाना पटोलेंची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीची तक्रार, आता अजितदादा म्हणतात…

First Published on: May 16, 2022 3:16 PM
Exit mobile version