भाजपच्या ‘या’ नेत्याचा राज्याच्या राजकारणातून काढता पाय; म्हणाले, नो महाराष्ट्र ओनली राष्ट्र

भाजपच्या ‘या’ नेत्याचा राज्याच्या राजकारणातून काढता पाय; म्हणाले, नो महाराष्ट्र ओनली राष्ट्र

भाजपचे वरिष्ठ आणि केंद्रीय नेते विनोद तावडे राज्याच्या राजकारणात मला अजिबात स्वारस्य नाही, असे म्हटले आहे.

एकीकडे राज्याच्या आणि केंद्राच्या निवडणुका एकाच वेळी होणार असल्याचे म्हटले जात असताना, आता राज्याच्या राजकारणातून मात्र मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते आणि भाजपचे वरिष्ठ आणि केंद्रीय नेते विनोद तावडे मात्र राज्याच्या राजकारणात मला अजिबात स्वारस्य नाही, असे म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. नो महाराष्ट्र, ओनली राष्ट्र, असे विनोद तावडे म्हणाले. यावेळी  त्यांनी अनेक विषयांवरदेखील भाष्य केले आहे.

आता राष्ट्र, नो महाराष्ट्र

आता केवळ राष्ट्र, नो महाराष्ट्र असे एवढ्याचसाठी म्हणतो की, केंद्रीय स्तरावर राजकारण करताना खूप अनुभव येतात. राष्ट्राच्या राजकारणात काम करताना, तुमची दृष्टी खूप व्यापक होते, तुम्हाला खूप शिकायला मिळतं. उत्तर प्रदेशच्या निवडुकांची माझ्यावर जबाबदारी होती, 402 विधानसभांचं राजकीय, सामाजिक विश्लेषण करायचं आणि त्याप्रकारचे देशभरातील नेते तिथे पाठवायचे, यातून तुम्हाल संपूर्ण उत्तर प्रदेश समजतो. देशातील राज्यांतील राजकीय स्ट्रॅटेजी काय आहे हे तुम्हाला समजते. त्यामुळे केंद्रात काम करताना खूप शिकायला मिळते. राष्ट्राच्या राजकारणातून अनेक गोष्टी समजतात. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा येण्याचा माझा मानस नाही, असे विनोद तावडे म्हणाले.
राज्याला गरज असेल तर, मी मदत करणार

राज्यातील भाजपचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम सुरु आहे. राज्यातील भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांची चांगली टीम आहे. त्यामुळे इकडे लक्ष देण्याची गरज नाही. हा कधी राज्याला माझी गरज लागली तर नक्की मदत करेन, असे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले आहे.

( हेही वाचा: आता पुन्हा सभागृहात येण्याची इच्छा नाही; भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत )

राज्यातील भाजपमध्ये दोन गट नाहीत

मी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गट तयार करतो, यात अजिबात तथ्य नाही. आमच्यात अजिबात दोन गट नाहीत आणि मी हे अगदी मनापासून सांगतो. महाराष्ट्रात भाजप पक्ष कसा मोठा होईल, यासाठीच सगळे मिळून काम करत असतात, असे मत मांडत देवेंद्र फडणवीस आणि माझ्य़ात मतभेद नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मी राष्ट्रीय राजकारणात- पंकजा मुंडे

मी राष्ट्रीय सचिव आहे. मी राष्ट्राच्या राजकारणात असते. त्यामुळे मी राज्यातील कार्यक्रमांना हजेरी लावत नाही,असे वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील यापूर्वी केले आहे.

First Published on: March 21, 2023 6:01 PM
Exit mobile version