भाजपाचा ६२ वर्षांतील ऐतिहासिक विजय, काँग्रेसची ३२ वर्षांत वाताहात!

भाजपाचा ६२ वर्षांतील ऐतिहासिक विजय, काँग्रेसची ३२ वर्षांत वाताहात!

Gujarat Election 2022 | अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणूक नेहमीच देशातील राजकारणाची दिशा ठरवते. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला कडवी टक्कर दिली होती. काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत झाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीसाठी सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस पार भूईसपाट झाल्याचं चित्र आहे. १९९० मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक कमी म्हणजेच ३३ जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, सध्या हाती येत असलेल्या आकडेवारीनुसार, काँग्रेस २५ चा आकडाही पार करू शकणार नाही, असा दावा राजकीय तज्ज्ञांकडून केला जातोय.

हेही वाचा – गुजरातमध्ये भाजपाचाच बोलबाला, विक्रमी बहुमताकडे वाटचाल; काँग्रेस-आपचा सुपडा साफ

१९६० पासून गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या इतिहासात काँग्रेसने एवढा सपाटून मार खाल्ला नव्हता. भाजपाने १५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतलेली असताना काँग्रेस मात्र १७ ते २० जागांवरच स्थिर राहत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत संपूर्ण निकाल हाती आला तरी काँग्रेस २५ च्या वर जात नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तर, भाजपानेही ६२ वर्षांत पहिल्यांदा १५० चा आकडा पार केला आहे. त्यामुळे ६२ वर्षांत भाजपाचीही ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचं म्हटलं जातंय.

हेही वाचा – Gujarat Election Result Live Update : गुजरातमध्ये ११ डिसेंबरला शपथविधीची शक्यता

१९९० मध्ये काँग्रेसने सर्वांधिक कमी जागा जिंकल्या होत्या. तेव्हा फक्त ३३ जागांवर काँग्रेस जिंकून आली होती. त्यानतंरच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होत गेली. २००२ मध्ये काँग्रेसने ५० जागा मिळवल्या. तर, २००७ मध्ये काँग्रेस ५९ जागांवर विजयी ठरली. २०१७ ची निवडणूक भाजपासाठी फार आव्हानात्मक ठरली. राहुल गांधी यांनी त्यावेळी जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे गुजरातमध्ये सत्ताबदल होण्याचे संकेत मिळत होते. मात्र, त्यावेळी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. ७७ जागांवर विजयी होत भाजपाला कडवी टक्कर दिली होती. मात्र, आताच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

गुजरातमध्ये एकूण १८२ विधानसभेच्या जागा आहेत. बहुमतासाठी ९२ जागांची गरज आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपाला ९९, काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. ६ जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. राज्यातील जागांवर क्षेत्रवार नजर टाकल्यास मध्य गुजरातमध्ये ६८, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ५४, उत्तर गुजरातमध्ये ३२ आणि दक्षिण गुजरातमध्ये २८ जागा आहेत.

हेही वाचा – Gujarat Election: २०१७ मध्ये सर्वाधिक जिल्ह्यात काँग्रेसची मुसंडी, मग भाजपाने कशी सत्ता स्थापन केली?

First Published on: December 8, 2022 12:53 PM
Exit mobile version