आता थेट नारायण राणेंशीच संवाद, स्थानिक नेत्यांशी नाही, केसरकरांचा निलेश राणेंना टोला

आता थेट नारायण राणेंशीच संवाद, स्थानिक नेत्यांशी नाही, केसरकरांचा निलेश राणेंना टोला

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रती आपली आजही निष्ठा असल्याचे शिंदे गटातील आमदारांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यावरून भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यात कलगीतुरा रंगला होता. पण यापुढे थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संवाद साधणार असल्याचे सांगत केसरकर यांनी या वादावर पडदा टाकला आहे.

शिंदे गटातील आमदारांनी वेळोवेळी उद्ध ठाकरे यांच्याबद्दल कायम आदरच व्यक्त केला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी देखील हीच भूमिका कायम मांडली आहे. पूर्वीपासून राजकीय वैर असलेल्या निलेश राणे आणि केसरकर यांच्यात यावरूनच शाब्दिक युद्ध रंगले होते आणि त्यांनी एकमेकांची लायकी काढली होती. तसेच उद्धव ठाकरे यांचा एवढा पुळका असेल दीपक केसरकरांना तर जाऊन मातोश्रीवर त्यांची भांडी घासा, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले होते. त्यावरून आपण फक्त नारायण राणे यांच्याशी संवाद साधणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – वाट बघण्यालाही मर्यादा असतात, शिंदे गटाचा ठाकरेंना अप्रत्यक्ष अल्टिमेटम

उद्धव ठाकरे यांचा आदर राखला जावा, अशी आमची भूमिका भाजपानेही मान्य केली आहे. किरीट सोमय्या यांच्यासारख्या ज्येष्ठ भाजपा नेत्यांनीही ते स्वीकारले आहे. तरीही निलेश राणेंकडून तसे वक्तव्य केले गेले. त्यांनी केलेल्या त्या ट्वीटवरून एकाही शिवसेनेच्या नेत्याने अथवा कार्यकर्त्याने प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे यापुढे कोणीही काहीही बोलले तरी मी प्रतिक्रिया देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

इतकी वर्षे राजकारणात असलेले नारायण राणे हे परिपक्व राजकारणी आहेत. मीही वयाने ज्येष्ठ आहे. त्यामुळे कोकणच्या विकासासंदर्भात बोलायचे झाल्यास भाजपा नेत्यांच्या माध्यमातून मी नारायण राणेंशी संवाद साधेन; पण स्थानिक पातळीवर कोणाशी बोलणार नाही, असे निलेश राणे यांचे नाव न घेता सांगितले.

हेही वाचा – वाईट वेळही निघून जाईल.., विराट कोहलीच्या समर्थनार्थ पाकिस्तानच्या बाबर आझमचं मोठं वक्तव्य

First Published on: July 15, 2022 3:02 PM
Exit mobile version